Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सव हा सगळ्यांच्या आवडीचा उत्सव आहे. प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गणेशोत्सव म्हणजे फक्त सामान्य लोकांसाठीच नाही तर मराठी कलाकारांसाठीसुद्धा खास असतो. यंदाही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swwapnil Joshi) घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. स्वप्नीलने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणली असून, बाप्पाचे स्वागत त्याने पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात केलं आहे.
स्वप्नील जोशी टीम या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अभिनेत्याच्या घरातील बाप्पाच्या आगमनाचा खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील आपल्या कुटुंबासोबत गणपतीच्या मूर्तीला घरात आणताना दिसत आहे. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात त्याने बाप्पाचं स्वागत केलं आहे. स्वप्नीलने पारंपरिक वेशभूषा परिधान केली. त्याने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. स्वप्निल जोशीचा हा लूक एकदम खास वाटत आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यही पारंपरिक पोशाखात दिसत आहेत. हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला असून, अनेकजण त्याला शुभेच्छा देत आहेत.
स्वप्नीलच्या घरात दरवर्षी गणपती बसतो आणि तो हा सण अत्यंत भक्तीभावाने साजरा करतो. स्वप्नीलप्रमाणेच इतर अनेक कलाकारांच्या घरीही बाप्पाचं थाटात आगमन झालं आहे. यंदाच्या वर्षी अनेक कलाकारांनी बाप्पाची मूर्ती स्वतःच तयार केली आहे. शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याकडे कलाकारांचा कल वाढलेला दिसतोय. अनेक कलाकारांनी स्वतःच्या हातांनी इको-फ्रेंडली बाप्पाची मूर्ती साकारली असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातून पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेशही दिला जात आहे.