Join us

स्वप्नील जोशी म्हणतोय, 'मी पण सचिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 17:28 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

ठळक मुद्दे'मी पण सचिन' सिनेमा १ फेब्रुवारी २०१९ ला होणार प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई', 'एका लग्नाची गोष्ट', 'तुहीरे' व 'दुनियादारी' यांसारख्या चित्रपटातून स्वप्नीलने तरूणाईवर अधिराज्य गाजवले. आता तो एका वेगळ्या भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'मी पण सचिन'. 

स्वप्नील जोशीने पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आगामी चित्रपट मी पण सचिनचे पहिले वहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, 'पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गणराज असोसिएट्स सादर करत आहेत मी पण सचिन. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयस जाधवने केले असून हा सिनेमा १ फेब्रुवारी २०१९ ला जगभर प्रदर्शित होणार आहे. '

स्वप्नील जोशीने सिनेमाचा पोस्टर शेअर केला असला तरी या सिनेमातील त्याच्या भूमिकेबद्दल व कथेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. तसेच या सिनेमातील इतर कलाकारांची नावेदेखील अद्याप गुलदस्त्यात आहे. या सिनेमातून मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयस जाधव लेखक व दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेतून रसिकांच्या समोर येणार आहे. या सिनेमाचा पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात आहे. स्वप्नीलचे चाहते या सिनेमाबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :स्वप्निल जोशी