Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत शेलारने केला शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 15:29 IST

बॉलिवुडच असो या मराठी चित्रपटसृष्टी यातील बरेच कलाकार एका ठराविक काळानंतर राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. तसेच काही ...

बॉलिवुडच असो या मराठी चित्रपटसृष्टी यातील बरेच कलाकार एका ठराविक काळानंतर राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. तसेच काही कलाकारांनी राजकारणात आपले स्थानदेखील निर्माण केलेले पाहायला मिळत आहेत. आता हेच पाहा ना, अमोल कोल्हे, आदेश बांदेकर यांच्यापाठोपाठ आता अभिनेता सुशांत शेलारदेखील राजकारणात पाहायला मिळणार आहे. सुशांतने नुकतेच शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. या अभिनेत्याने मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी संजय राऊतदेखील उपस्थित होते. त्यामुळे आता सुशांतच्या चाहत्यांना तो एक नवीन जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. अभिनयानंतर हा अभिनेता आता राजकारणात आपली भूमिका पार पाडण्यास सज्ज झाला आहे. त्याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचबरोबर त्याने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचा दुनियादारी हा चित्रपट प्रचंड हीट झाला होता. या चित्रपटातील त्याची प्रिन्सची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. या चित्रपटात सुशांतने अभिनेत्री सई ताम्हणकरच्या भावाची भूमिका साकारली होती. या रिल लाइफमधील भावबहिणीची ही जोडी खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर तो क्लासमेट, तू ही रे, धूम टू धमाल, मॅटर, ब्लाइड गेम, संघर्ष अशा अनेक चित्रपटांचादेखील समावेश आहे. रूपेरी पडदयाबरोबरच या अभिनेत्याने आपल्या अभिनयाची चुणूक छोटया पडदयावरदेखील दाखविली आहे. त्याने या गोजिरवाण्या घरात, मयूरपंख, किमयागार, घे भरारी, काटा रूते कोणाला, इंद्रधनुष्य अशा अनेक मालिकादेखील केल्या आहेत.