Join us

सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 10:11 IST

सूरजचा 'झापुक झुपूक' आता महाराष्ट्रातील सर्व थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे.

'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. बारामतीमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या सूरजने त्याच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकून घेतलं. दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्याला थेट सिनेमात हिरोची भूमिका साकारण्याची संधी दिली. सूरजचा 'झापुक झुपूक' आता महाराष्ट्रातील सर्व थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे. सिनेमा लवकरच कोटींच्या घरात प्रवेश करेल असा अंदाज आहे.

'झापुक झुपूक'ची कमाई किती?

'झापुक झुपूक' सिनेमा २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. रिलीजला आता चार दिवस झाले आहेत. 'सॅकनिल्क'च्या अहवालानुसार पहिल्या दिवशी शुक्रवारी सिनेमाने २४ लाखांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी शनिवारीही २४ लाख कमावले. रविवारी कमाईत थोडी घट होत सिनेमाने १९ लाखांचा गल्ला जमवला. तर काल चौथ्या दिवशी सिनेमाने १४ कोटी कमावले. आतापर्यंत सिनेमाने एकूण ८१ लाखांचा आकडा गाठला आहे. तर आता सिनेमा काही दिवसात कोटींच्या घरात जाईल असाही अंदाज आहे. 

'झापुक झुपूक' सिनेमाविषयी

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमात सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत पायल जाधव, मिलिंद गवळी, दिपाली पानसरे, जुई भागवत हे कलाकार पाहायला मिळत आहेत. सिनेमाची गाणी प्रेक्षकांमध्ये आधीच हिट झाली आहेत.

टॅग्स :मराठी चित्रपटबिग बॉस मराठीकेदार शिंदे