'महासत्ता २०३५' मध्ये नागेश भोसले साकारताहेत थरारक खलनायक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 11:51 IST
चित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हडाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. 'महासत्ता २०३५' या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका ...
'महासत्ता २०३५' मध्ये नागेश भोसले साकारताहेत थरारक खलनायक !
चित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हडाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. 'महासत्ता २०३५' या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत नागेश भोसले. त्यांच्या अभिनयाच्या ताकदीमुळे चित्रपटातील नायकाची गुणवत्ता प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येईल. ते आबासाहेब नामक राजकारण्यांच्या भूमिकेत असून चित्रपटाचा नायक रोहित, जी भूमिका साकारलीय रामप्रभू नकाते यांनी, याच्या सामान्य माणूस ते वजनदार राजकारणी या प्रवासात अडथळे निर्माण करण्याचे काम करीत असतात, सातत्याने. त्याची कुचेष्टा करणे, निंदानालस्ती करणे, जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करणे अशा मोहीमा राबवित असतात. त्यांच्या या दुष्कृत्यांत त्यांना साथ मिळते गावच्या पाटलांची व राजकारणी झुंझारराव यांची. नागेश भोसले हे नाटक, सिनेमा, दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांतून प्रेक्षकांना सामोरे जात असतात. त्यांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विविधांगी भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिलीय. ते उत्तम अभिनेते तर आहेच परंतु उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत. 'पन्हाळा' या त्यांच्या पहिल्या दिग्दर्शनीय चित्रपटाला भरपूर पुरस्कार मिळाले तसेच त्यांच्या येऊ घेतलेल्या 'नाती खेळ' या चित्रपटालाही देशी विदेशी महोत्सवांतून वाहवाही मिळत आहे. नागेश भोसले यांनी याआधीही खलनायकाच्या भूमिका साकारल्या असल्या तरी 'महासत्ता २०३५' मधील त्यांची भूमिका आजपर्यंत केलेल्या खलनायकापेक्षा वेगळी आहे. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची थाप मिळाली आहे. हा चित्रपट तब्बल ४९ आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून वाखाणला गेलाय व त्याने अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे. अशा या बहु-पुरस्कार प्राप्त चित्रपटातून नागेश भोसले यांची अभिनयक्षमता न्याहाळणे रंजक ठरणार आहे. 'महासत्ता २०३५' हा चित्रपट येत्या १८ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.