सुमीत राघवन हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. एक अभिनेता असण्यासोबतच सुमीत जागरुक नागरिकही आहे. समाजातील अनेक घडामोडींवर तो परखडपणे त्याचं मत व्यक्त करत असतो. आतादेखील सुमीतने महत्त्वाच्या विषयावर भाष्य करत लक्ष वेधून घेतलं आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने संतप्त पोस्ट लिहिली आहे.
सुमीत राघवनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. कळुसाबाई शिखरावरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत कळसुबाई शिखरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसत आहे. कळसुबाई शिखरावरील हा व्हिडीओ पाहून सुमीतने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "शरम वाटते... खरंच कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र? एरवी शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून गळा काढणारे प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे अनुयायी यावेळी त्यांची अस्मिता दुखावली जात नाही?" असं त्याने म्हटलं आहे.
या सगळ्याची जबाबदारी नक्की कोणाची? कोण घेणार? असा सवालही त्याने उपस्थित केला आहे. पुढे सुमीतने पोस्टमध्ये "घेईल का कोणी जबाबदारी? कठोर कारवाई होईल का? आपल्या ऐतिहासिक वास्तूंची आपण काळजी घेऊ शकतो का? हा प्रश्न जनतेला सुद्धा आहे", असं म्हटलं आहे. सुमीतने शेअर केलेला कळसुबाई शिखरावरचा व्हिडीओ हा sustainifyyourlife या अकाऊंटवरचा आहे.