Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बोक्या सातबंडे'च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 18:25 IST

Bokya Saatbande : यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या 'बोक्या सातबंडे' या बालनाट्याचा ७५वा प्रयोग २३ मे रोजी बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगणार आहे.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या 'बोक्या सातबंडे' (Bokya Saatbande) या बालनाट्याचा ७५वा प्रयोग २३ मे रोजी बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगणार आहे. लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप थिएटरची निर्मिती असलेले 'बोक्या सातबंडे' या नाटकास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आगळावेगळा विषय आणि त्याच्या उत्तम सादरीकरणामुळे हे बालनाट्य लहान मुलांबरोबरच इतर वयोगटामधील प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरलं आहे.

नाटकाच्या यशस्वी वाटचालीविषयी नाटकाचे निर्माते  प्रणव जोशी सांगतात, "व्यावसायिक नाटकांबद्दल बोलायचे झाल्यास  मुंबई, पुणे, नाशिक या व्यावसायिक नाटकांच्या त्रिकूटाबाहेर फारशी जात नाहीत; पण याला अपवाद 'बोक्या सातबंडे' बालनाट्य आहे.  या बालनाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांबरोबरीने  पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, मराठवाडा, जळगाव, औरंगाबाद याही भागात 'बोक्या सातबंडे' पोहोचले आहे. फक्त पोहोचले नाही तर लोकप्रियही झाले आहे."

लवकरच नाटकाचा १०० वा प्रयोगही होईल सादर

'बोक्या सातबंडे'ची वाटचाल लवकरच ७५ व्या प्रयोगाकडून १००व्या प्रयोगाकडे होणार आहे', अशी प्रतिक्रिया नाटकाच्या दिग्दर्शिका दीप्ती जोशी यांनी व्यक्त केली. दीप्ती जोशी सांगतात, "नाटकाची शंभराव्या प्रयोगाकडे वाटचाल होतेय याचा दिग्दर्शक म्हणून मला आनंद आहे. बोक्याची आणि नाटकात असणाऱ्या इतर पात्रांशी मुलांची खूप गट्टी झालेली आहे. नाटक संपल्यावर मुले आवर्जून पात्रांना भेटतात. वेगवेगळ्या शहरात विखुरलेल्या आपल्या मित्रांना नाटक बघण्यास सांगतात.  आमच्या कलाकृतीची लोकप्रियता इतकी वाढलीय की, लवकरच नाटकाचा १०० वा प्रयोगही सादर होईल." 

नाटकात आहेत हे कलाकार

मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या 'बोक्या सातबंडे' चे नाट्य रुपांतर डॉ. निलेश माने यांनी केलं असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी तर, मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. नाटकातील गीत वैभव जोशी आणि संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. नाटकाचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनीच सेट ची  उभारणी केलेली आहे. दृष्य संकल्पना प्रणव जोशी, प्रकाश योजना राहूल जोगळेकर, वेशभूषा महेश शेलार, रंगभूषा कमलेश बिचे आणि कोरिओग्राफी संतोष भांगरे यांची आहे. आरुष प्रसाद बेडेकर, यश शिंदे, सिद्धा आंधळे, सौरभ भिसे, शीवांश दीप्ती प्रणव जोशी, सागर पवार, आकाश मांजरे, प्रफुल्ल कर्णे,अमृता कुलकर्णी. या कलाकारांच्या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.