Join us

छंद प्रितीचा चित्रपटात दिसणार सुबोध चा नवा अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 17:29 IST

'हृदयांतर', 'तुला कळणार नाही' अशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारा आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक ...

'हृदयांतर', 'तुला कळणार नाही' अशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारा आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखले जाणारा  सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावे आता लवकरच 'प्रेमला पिक्चर्स' निर्मित 'छंद प्रितीचा' चित्रपटात झळकणार आहे.येत्या १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटात सुबोध एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या नृत्यशैलीवर आधारित 'छंद प्रितीचा' हा आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहे.तमाशातील तन मन आणि धन ओतून वावरणार्‍या प्रत्येक मनस्वी कलाकाराच्या जीवनाचा वेध घेणारा हा चित्रपट आजवर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून विशेषत: चरित्रात्मक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सुबोध भावे या चित्रपटातून 'राजाराम' नावाचा एका ढोलकी वादकाच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  संगीत आणि सुबोध यांचं अतूट नातं आपण ह्या आधी देखील 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातून पाहिलं आहे. संगीताचा कोणताही प्रकार असो, सुबोधची त्यातील वाखाणण्याजोगी असलेली जाण आता आपणांस पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. निर्माते चंद्रकांत जाधव यांच्या 'प्रेमला पिक्चर्स' निर्मित 'छंद प्रितीचा' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केले असून छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचे आहे तर संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलेले आहे.या सिनेमाचं पोस्टर पाहिलं की मराठीत गाजलेल्या 'पिंजरा' आणि 'सांगत्ये ऐका' या सिनेमांची आठवण येते. तमाशाप्रधान सिनेमांनी मराठी सिनेमाचा एक काळ गाजवला होता. तमाशा आणि सिनेमा हे जणू काही समीकरणच बनलं होतं. रसिकांनाही तमाशा, त्यातील सामना, लावण्या सारं काही चांगलंच भावायचं. मात्र काळ बदलला आणि मराठी सिनेमातून तमाशा निघून गेला. एखाद दुसरी लावणी, गाणं इतकंच काही ते तमाशाचं स्वरुप सिनेमात दिसू लागले. गेल्या काही दिवसांत तमाशावर आधारित गाणं सिनेमात दिसलं नव्हतं. मात्र आता छंद प्रितीचा या सिनेमातून पुन्हा एकदा मराठी रसिकांना तमाशा पाहायला मिळणार आहे. गावापासून शहरापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं मनोरंजन करणा-या तमाशाचा आनंद रसिकांना या सिनेमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.