Join us
Daily Top 2Weekly Top 5

मकरंद अनासपुरे झळकणार एक हट्टी मुलगी या नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 13:14 IST

विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले एक हट्टी मुलगी हे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात प्रिया तेंडुलकर यांनी प्रमुख भूमिका ...

विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले एक हट्टी मुलगी हे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात प्रिया तेंडुलकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हे प्रसिद्ध नाटक प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.जुनी नाटके नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा ट्रेंड गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपूर्वी रंगमंचावर गाजलेली अनेक नाटकं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील बर्वे यांच्या हर्बेरियमने तर ही अनेक जुनी नाटके नव्या रूपात आणली होती आणि या नाटकांचे चांगले कौतुक देखील झाले होते. विजय तेंडुलकर यांच्या एक हट्टी मुलगी या नाटकाची तर सध्या चांगलीच तयारी सुरू आहे. या नाटकाद्वारे मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेता रंगमंचावर परतणार आहे. मकरंद अनासपुरे या नाटकात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. मकरंद अनासपुरेने दे धक्का, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे तर केशवा माधवा या नाटकात तो काही वर्षांपूर्वी झळकला होता. पण आता तो एक हट्टी मुलगी या नाटकाद्वारे अनेक वर्षांनी रंगमंचावर परतणार आहे. एक हट्टी मुलगी हे नाटक सुयोग ही नाट्यसंस्था प्रेक्षकांच्या भेटीस आणणार असून सध्या कलाकारांची जुळवाजुळव सुरू आहे. हे नाटक पुढील काहीच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे कळतेय. या नाटकाचे दिग्दर्शन प्रकाश बुद्धीसागर यांनी केले होते. तर या नाटकात प्रिया तेंडुलकरसोबत सुप्रिया मतकरीची महत्त्वाची भूमिका होती. तात्या आणि त्यांच्या सूनेतील संघर्ष प्रेक्षकांना या नाटकात पाहायला मिळाला होता. या नाटकात तात्या ही भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. हे नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या नाटकातील प्रिया तेंडुलकर, दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.