राज्य नाटय स्पर्धेच्या पारितोषिकांची रक्कम वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 15:57 IST
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातुन आयोजित होणा-या राज्य नाटय महोत्सवाअंतर्गत घेतल्या जाणा-या हौशी मराठी, मराठी व्यावसायिक, संगीत, संस्कृत, हिन्दी, बालनाटय ...
राज्य नाटय स्पर्धेच्या पारितोषिकांची रक्कम वाढणार
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातुन आयोजित होणा-या राज्य नाटय महोत्सवाअंतर्गत घेतल्या जाणा-या हौशी मराठी, मराठी व्यावसायिक, संगीत, संस्कृत, हिन्दी, बालनाटय स्पर्धेतील पारितोषीकांच्या रकमेत तसेच सादरीकरणासाठी येणारा खर्च, दैनिक भत्ता आदींच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक 9 जानेवारी 2017 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2016-17 चा अर्थसंकल्प राज्य विधानमंडळात सादर करताना यासंदर्भात केलेल्या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे.हौशी मराठी नाटय स्पर्धा, बालनाटय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या तसेच अंतिम फेरीच्या सर्वच पारितोषीकांच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. हौशी हिन्दी नाटय स्पर्धा, संस्कृत नाटयस्पर्धा, संगीत नाटयस्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सर्वच पारितोषीकांच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तर मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रथम येणा-या नाटकाला आता 7 लक्ष 50 हजार रू., द्वितीय क्रमांकाच्या नाटकाला 4 लक्ष 50 हजार रू. तृतीय क्रमांकाच्या नाटकाला 3 लक्ष रू. अशी वाढ करण्यात आली असुन या अंतिम फेरीच्या अन्य पारितोषीकांच्या रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे.नाटय स्पर्धेत सहभागी होणा-या कलाकारांकरिता दैनिक भत्ता, परिक्षकांकरिता दैनिक भत्ता, प्राथमिक व अंतिम फेरीसाठीच्या सादरीकरणाचा खर्च यांच्या रकमेत सुध्दा वाढ करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याला देशात वेगळी ओळख देणा-या राज्य शासनाच्या राज्य नाटय महोत्सवाअंतर्गत घेण्यात येणा-या या स्पर्धांच्या पारितोषीकांच्या रकमांसह सादरीकरणाचा खर्च, दैनिक भत्ता आदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे राज्यातील रंगकर्मींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.