अमृता फडणवीस यांनी गायले डॉक्टर रखमाबाई या चित्रपटातील गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 15:10 IST
डॉक्टर रखमाबाई या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात तनिष्ठा चॅटर्जी प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटातील एक ...
अमृता फडणवीस यांनी गायले डॉक्टर रखमाबाई या चित्रपटातील गाणे
डॉक्टर रखमाबाई या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात तनिष्ठा चॅटर्जी प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले. हे गाणे अमृता फडणवीस यांनी गायले असून मराठी चित्रपटात गाणे गाण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. अमृता फडणवीस यांनी कुणाल कोहलीच्या फिर से, प्रकाश झा यांच्या जय गंगाजल या हिंदी चित्रपटासाठी आणि संघर्ष यात्रा या मराठी चित्रपटासाठी त्यांचा आवाज दिला आहे. आता डॉक्टर. रखमाबाई या चित्रपटात त्या एक गाणे गाणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत आहेत. या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच जुहूमधील एका स्टुडिओत करण्यात आले. याविषयी अमृता फडणवीस सांगतात, "रोहन गोखले आणि रोहन प्रधान यांनी या गीताला खूप छान संगीत दिले आहे. हे गाणे ऐकताना आपण 100 वर्षँ मागे गेल्याचा आपल्याला भास होतो. त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच खूपच कमी वयात त्यांचे लग्न करून दिले जात असे. पण त्याही परिस्थितीत रखमाबाई लंडनला गेल्या आणि त्यांनी शिक्षण घेतले, त्या डॉक्टर बनल्या. हे गीत खूप छान असून यातून त्यांचे स्वप्न, त्यांच्या भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत. हे गीत गाताना खूपच मजा आली." अमृता फडणवीस यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. त्यांनी त्यांची नोकरी सांभाळून त्यांचा हा छंद जोपासला. आजही त्या दिवसातून काही तास तरी रियाजाला देतात. दिवसभरात कामातून रिकामा वेळ न मिळाल्यास मी गाडीत तरी दहा मिनिटे रियाज करते असे त्या सांगतात.