Join us

जमतं की!! सोनाली कुलकर्णी बनली टीव्ही अँकर,न्यूजरूममध्ये बसून दिलं खरं बुलेटिन, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 14:01 IST

Sonalee Kulkarni: सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात सोनाली टीव्ही अँकरच्या रूपात एका चॅनेलच्या न्यूजरूममध्ये बसून बातम्या देताना दिसतेय.

बॉलिवूडची अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचा नवा सिनेमा ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. सध्या काय तर सोनाली या चित्रपटाचं जोरात प्रमोशन करतेय. पण याचदरम्यान  सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात सोनाली टीव्ही अँकरच्या रूपात एका चॅनेलच्या न्यूजरूममध्ये बसून बातम्या देताना दिसतेय. त्यासुद्धा खऱ्या खुऱ्या बातम्या.

सोनालीने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘नमस्कार मी शेफाली... घेऊन आले आहे आजच्या ठळक बातम्या,’असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाली स्वत:ची ओळख शेफाली अशी करून देते. अ‍ँकरच्या रूपात ती दिसते आणि अगदी खºया पत्रकाराप्रमाणे बुलेटिन देते.  राजकारणापासून ते निवृत्तीनाथांच्या पालखीसोहळ्यापर्यंत सगळ्या चालू घडामोडी वाचून दाखवते. आता ही काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे. या चित्रपटात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारते आहे. याच चित्रपटाच्या निमित्तानं तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनालीचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.  या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तू काहीही करू शकतेस, अशा शब्दांत एका चाहत्यानं तिचं कौतुक केलं आहे. जमलं की..., असं लिहित एकाने तिचं कौतुक केलं आहे. तू खरोखर न्यूज अँकर असतीस तर मी रोज न्यूज बघितल्या असत्या, अशी कमेंट एकाने केली आहे.

सोनालीचा हा आगामी सिनेमा येत्या 15 जुलैला रिलीज होतोय. या चित्रपटात सोनालीसोबत, सचित पाटील, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी अशी अनेक दमदार कलाकारांची फौज दिसणार आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी