Join us
Daily Top 2Weekly Top 5

'काही जणांनी शिंदे साहेब अशी हाक मारली अन्', 'धर्मवीर' फेम क्षितीश दातेनं सांगितला 'तो' अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 17:38 IST

Dharmaveer Fame Kshitish Date: 'धर्मवीर'मध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका अभिनेता क्षितीश दातेनं साकारली होती.

कोणताही कलाकार विशेषत: अभिनेता त्याच्या कारकीर्दीत अशा एका भूमिकेच्या शोधात असतो जी भूमिका त्याच्या करिअरला वेगळी कलाटणी देणारी असेल.  अभिनेता क्षितीश दाते याने धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे (Dharmaveer Movie) या सिनेमाच्या निमित्ताने हा अनुभव घेतला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्याचा प्रवास उलगडून दाखवणाऱ्या या सिनेमाची मोट बांधत असताना आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेले, त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांची भूमिका माझ्यासाठी फक्त भूमिका नव्हती तर तो एक अनुभव होता असं सांगत अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date)याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. झी टॉकीज वाहिनीवर २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हा सिनेमा घरी बसून पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.

धर्मवीर…मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाने अक्षरश: रेकार्डब्रेक कमाई केली. अजूनही या सिनेमाची चर्चा थांबलेली नाही. आता हा सिनेमा झी टॉकीज या वाहिनी वर दाखवला जाणार आहे . अभिनेता प्रसाद ओक या सिनेमात आनंद दीघे यांच्या भूमिकेत आहे तर क्षितीश दाते याने वठवलेली एकनाथ शिंदे यांचीही भूमिका खूप गाजली आहे. वर्ल्ड टेलीविजन प्रीमियरच्या निमित्ताने बोलताना क्षितिश म्हणाला, धर्मवीर सिनेमाचे निर्माते मंगेश कदम यांच्या डोक्यातील कल्पनेचं मूर्त रूप आहे. प्रवीण तरडे यांनी या सिनेमाला त्यांच्या दिग्दर्शनाचा असा काही टच दिला आहे की भट्टी जुळून येणं म्हणजे काय असतं ते या टीमने दाखवून दिलं. सिनेमाची स्क्रिप्ट, संवाद, मांडणी यापेक्षाही आव्हान होतं ते धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे अशा प्रमुख व्यक्तिरेखांचा लूक साकारणं. माझ्याकडे जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेची ऑफर आली तेव्हा आनंद आणि टेन्शन अशा संमिश्र भावना माझ्या मनात तयार झाल्या. अभिनेता म्हणून खूप  मोठी संधी माझ्या हातात होती. प्रसाद ओक आनंद दिघे साकारणार होते आणि मी एकनाथ शिंदे. हे जेव्हा ठरलं तेव्हा मी पहिल्यांदा प्रसाद ओकला माझ्या मनातील दडपण बोलून दाखवलं. हे मला जमेल का ? हा माझा प्रश्न होता. कारण एखादं काल्पनिक पात्र साकारणं आणि प्रत्यक्षात असलेली व्यक्ती भूमिका म्हणून सादर करणं यातील फरक मला नक्कीच माहित आहे. त्यामुळे खूप भीती वाटली. प्रसाददादाच्या मनातही आनंद दीघे यांच्या भूमिकेबाबत तेच दडपण होतं, पण जसा एकनाथ शिंदे यांचा लुक केला आणि एकेक संवाद, देहबोली, बाज यातून मी त्या भूमिकेत शिरलो तसा मी कधी त्यांच्यात एकरूप झालो हे मलाही समजले नाही.

क्षितीशने एक आठवण सांगितली, कपाळावरचा कुंकवाचा टिळा, केसाचा भांग पाडण्याची विशिष्ट पध्दत, पांढऱ्या रंगाचा शर्ट पँट हा पेहराव, बोलताना हाताची हालचाल, चालण्याची ढब हे सगळं निरीक्षणातून आत्मसात केलं. दिग्दर्शन टिमकडून काही इनपूट आलेच होते. मेकअप आणि कॉश्च्युम आर्टिस्टनी एकनाथ शिंदे यांचा लुक देण्यात कुठेच कसर सोडली नव्हती. ते त्यांचच श्रेय आहे. पण पुढचा प्रवास मला एकट्याने करायचा होता हे मी मनावर बिंबवलं. मी एकनाथ शिंदे यांचा लुक पूर्ण करून गाडीतून निघालो होतो. गाडी ठाण्यात आली. गाडीच्या काचा उघड्याच होत्या. तेव्हा जिथे सिग्नलला गाडी थांबेल किंवा ट्रॅफिकमध्ये गाडी स्लो होईल तेव्हा अनेक ठाणेकरांनी मला एकनाथ शिंदे समजून हात केला, नमस्कार केला, काही जणांनी शिंदे साहेब अशी हाक मारली. तिथे लूक म्हणून तर मी जिंकलो होतो आता पुढची जबाबदारी पार पाडायची हा निश्चय माझा ठाण्यातील त्याच छोट्या प्रवासात पक्का झाला.

एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली दादही मला या भूमिकेचं समाधान देणारी ठरली असं क्षितीश आत्मीयतेने म्हणतो. एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी जेव्हा मला पाहिलं, मला भेटले तेव्हा मी त्यांना त्यांचा एकनाथच वाटलो. मुळशी पॅटर्न सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तीरेखेची, सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेक लोकांच्या मनात असलेल्या व्यक्तीमत्वाची भूमिका खरी वाटेल अशी साकारणं हे माझ्यातील अभिनेत्याला आव्हानात्मकच होतं. पण मी खूप मेहनत घेतली. एकही बारकावा निसटणार नाही यासाठी माझा प्रयत्न होता. त्यामुळेच एकनाथ शिंदे ही खरच माझ्यासाठी भूमिका नाही तर एका आस्तित्वात असलेल्या व्यक्तीचं आयुष्य जगण्याचा अनुभव होता जो माझ्यासाठी कायम अविस्मरणीय असा राहिल. अर्थात झी टॉकीज वाहिनीवर २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता माझे काम  घरी बसून सर्व प्रेक्षक पाहतील याची मला खात्री आहेच .