Join us
Daily Top 2Weekly Top 5

​…म्हणून हृताने दिव्यांगांसोबत साजरा केला बालदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 17:25 IST

प्रत्येक बालकासाठी बालदिन हा खूप खास असतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन ...

प्रत्येक बालकासाठी बालदिन हा खूप खास असतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अशा या गोड दिवशी पालक किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहान मुलांसाठी विशेष भेटवस्तू आणतात. बालदिन हा प्रत्येकजण ज्याच्या-त्याच्या परीने साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागे मुलांचे चेह-यावरील फुलणारे हास्य हा एकमेव उद्देश असतो.बालदिन या दिवसाचा आनंद सर्वांना मिळाला पाहिजे आणि हाच उद्देश मनाशी ठेवून अभिनेत्री हृता दुर्गुळेने यंदाचा बालदिन आदित्य प्रतिष्ठान, ठाणे संचलित दिव्यांग कला केंद्र येथील विद्यार्थांसोबत साजरा करायचे ठरविले. दिव्यांग कला केंद्र येथे मुलांच्या कलागुणांना वाव दिले जाते. त्यांच्या अंगी असलेल्या कलेला अभिनय कट्टाचे अध्यक्ष, दिग्दर्शक किरण नाकती यांनी मार्गदर्शनाची जोड देऊन त्यांना स्वत:ची विशेष ओळख निर्माण करुन दिली. या उत्कृष्ट कामाचे कौतुक करण्यासाठी आणि मुलांमधील आत्मविश्वास आणखी वाढविण्यासाठी हृताने बालदिनाच्या निमित्ताने या शाळेला भेट देण्याचे ठरविले.शालेय आणि महाविद्यालयीन टप्प्यात हृताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये तिचे कौतुकही करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे हृताला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले. प्रत्येक व्यक्तीला कोणतेही काम करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच हृताने दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थांचे कलेशी निगडीत मार्गदर्शन केले. हृताने प्रेमाने आणि काळजीने चार गोष्टी समजवून सांगितल्यामुळे विद्यार्थांनी हृताला छानसे सरप्राईज दिले.या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलाने झाली आणि सर्व विद्यार्थांनी हृताचे सुंदररित्या स्वागत केले. या कार्यक्रमात विद्यार्थांनी एकापेक्षा एक उत्तम सादरीकरण करुन हृताकडून शाबासकीची थाप मिळवली. सादरीकरणासोबत विद्यार्थांमधील निरागसपणा आणि हृताचा मनमोकळा अन् हसमुख स्वभाव यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीच वाढली. दुर्वा या एकाच मालिकेत हृता झळकली होती. सध्या ह्रता फुलपाखरू मालिकेत वैदेही नावाची भूमिका साकारत आहे.