‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणारा चित्रपट लवकरच येईल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 13:36 IST
दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या ‘सैराट’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर न भुतो न भविष्यती ...
‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणारा चित्रपट लवकरच येईल’
दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या ‘सैराट’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर न भुतो न भविष्यती अशी कमाई करून दाखविली. ‘सैराट’चा तब्बल ८० कोटींपेक्षाही जास्त कमाईचा हा विक्रम भविष्यात बराच काळ अबाधित राहील, अशी भाकिते चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, सैराटचा रेकॉर्ड मोडणारा चित्रपट लवकरच येईल, असा ठाम विश्वास दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी व्यक्त केला आहे. आदित्य सरतपोतदार यांनी ड्रिमर्स पीआर डॉट कॉम या संकेतस्थळावर लिहलेल्या ब्लॉगमधून मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य केले आहे. गेल्या काही वर्षांत आलेले ‘किल्ला’, ‘फँड्री’, ‘कोर्ट’ हे पुरस्कार विजेते चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचणारे ‘दुनियादारी’, ‘टाईमपास’, ‘लय भारी’, ‘डबल सीट’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांकडे पाहिल्यास ही गोष्ट लक्षात येईल. गेल्या तीन वर्षांच्या काळात यापैकी प्रत्येक चित्रपटाने कमाईचे नवनवे विक्रम रचले आहेत. एखाद्या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर पाच ते सहा महिन्यांच्या काळातच नवीन चित्रपटाकडून त्याचा रेकॉर्ड मोडण्यात आल्याचा इतिहास आहे. निर्मात्यांच्या आक्रमक मार्केटिंग आणि मराठी सिनेमाची ताकद असणाऱ्या दमदार कथानकांमुळे हे शक्य होत असल्याचे मत आदित्य सरपोतदार यांनी व्यक्त केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत लार्जर दॅन लाईफ आणि बडी स्टारकास्ट असलेलेच चित्रपट चांगला व्यवसाय करताना दिसतात. याउलट, सशक्त कथानक ही नेहमीच मराठी चित्रपटांची ताकद राहिली आहे. मराठी प्रेक्षकही आवर्जून असे चित्रपट पाहायला जातात. त्यामुळे लवकरच एखादा नवीन चित्रपट ‘सैराट’च्या कमाईचा विक्रम मोडीत काढून १०० कोटींपर्यंत पोहचेल, असा विश्वास आदित्य सरपोतदार यांनी व्यक्त केला आहे.