सिद्धार्थ चांदेकरने आयटीएमच्या किचनमध्ये लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 11:54 IST
जेवणाच्या ताटात गुलाबजाम असणे हे नेहमीच स्पेशल असतं. आपण गुलाबजाम फक्त एकाच प्रकारचा चाखला असेल, फार तर 'कालाजामून ' ...
सिद्धार्थ चांदेकरने आयटीएमच्या किचनमध्ये लावली हजेरी
जेवणाच्या ताटात गुलाबजाम असणे हे नेहमीच स्पेशल असतं. आपण गुलाबजाम फक्त एकाच प्रकारचा चाखला असेल, फार तर 'कालाजामून ' किंवा गुलकंदाचा. पण ७५ पेक्षा जास्त वेगवेगळ्या चवीचे गुलाबजाम तयार करण्याचा आगळावेगळा प्रयोग हा आयटीएम मध्ये हॉटेल मॅनेजमेंट शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केला. आपल्या रोजच्या परिचयाच्या असलेल्या गुलाबजाम पेक्षा हटके आणि रुचकर असे गुलाबजाम या विद्यार्थ्यांनी तयार केले. सध्या बहुचर्चित सिनेमा असलेल्या "गुलाबजाम"चा सुपरहिट अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने या कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले. मराठी सिनेमा गुलाबजाम मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे मुख्य भूमिकेत आहेत. आयटीएम इन्स्टिटयूट मध्ये एलिमेंट २०१८ या खाद्यस्पर्ध्येमध्ये "गुलाबजाम" याच संकल्पनेअंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सिद्धार्थने एलिमेंट २०१८ ला हजेरी लावली. मुलांनी केलेले गुलाबजाम चाखत त्याने विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला.पुरणपोळी गुलाबजाम, रम गुलाबजाम, गुलकंद गुलाबजाम, मिंट आणि चणाडाळ गुलाबजाम पासून ते मटण हलवा गुलाबजाम सारख्या ७५ वेगवेगळ्या गुलाबजामचा आस्वाद सिद्धार्थने घेतला. “अशा प्रकारचा अफलातून प्रकार मी या आधी कधीच पहिला नाही. आपल्या चौकटीबाहेर जाऊन असा आगळा वेगळा प्रयोग करणे ही नेहमीच कौतुकाची बाब असते आणि मला खरंच या मुलांचे कौतुक करावेसे वाटतं, ज्यांनी एवढी मेहनत करून आमच्यासाठी हे खास गुलाबजाम बनवले असे यावेळी सिद्धार्थ चांदेकरने सांगितले. सिद्धार्थ चहा उत्तम बनवत असे, यामुळेच त्यालाही सिनेसृष्टीत पदापर्ण करण्याआधी शेफ होण्याची इच्छा होती असे सिद्धार्थने आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांच्या या प्रयोगामुळे खाद्यवेड्या सिद्धार्थसाठी ही गुलाबजाम "ट्रिप" एक वेगळा अनुभव देऊन गेली हे नक्की!सिद्धार्थचा गुलाबजाम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आणि सोनाली सोबत चिन्मय उद्गिरकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तसेच रेणुका शहाणेने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. Also Read : gulabjaam review : मस्त पाकात मुरलेला गुलाबजाम