Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धांत मोरेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, 'शिवा' सिनेमाचे पोस्टर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 16:56 IST

सिद्धांत मोरे हा नवीन चेहरा मराठी सिनेसृष्टीत लवकरच पाहायला मिळणार आहे. तो 'शिवा' चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

ठळक मुद्देसिद्धांत मोरेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण'शिवा - एक युवा योद्धा' या सिनेमाचे पोस्टर लाँच

सिद्धांत मोरे हा नवीन चेहरा मराठी सिनेसृष्टीत लवकरच पाहायला मिळणार आहे. तो 'शिवा' चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. शिवा - एक युवा योद्धा या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा अनोख्या पद्धतीने करण्यात आला. पारंपरिक पद्धतींचा अवलंब न करता, नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पत्रकारांच्या हस्ते सिनेमाचे पोस्टर लाँच करण्याची नवीन संकल्पना सिनेमाच्या टीम कडून राबविण्यात आली. समाजातील सद्य स्थितीचे तठस्थपणे वर्णन करणारे प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी यांचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन यंदाच्या पत्रकार दिनाचे नेमके औचित्य साधत एस.जी.एस. फिल्म्स निर्मित 'शिवा' या मराठी सिनेमाचे  प्रभावी पोस्टर अनावरण करण्यात आले.

पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथे झालेल्या या कार्यक्रमात सन्मानीय पत्रकार मंडळी विलास भेगडे (लोकमत), संदीप भेगडे (पुण्यनगरी), जगन्नाथ काळे (पुढारी), गणेश दुदम, मंगेश फत्ते, ऋषिकेश लोंढे, महेश भाग्यवंते आणि सिनेमातील प्रमुख कलाकार सिद्धांत मोरे, योगिता चव्हाण, दिग्दर्शक विजय शिंदे, निर्माते व्ही.डी. शंकरन, डॉ. संजय मोरे, गणेश दारखे उपस्थित होते.

शिवा सिनेमाची कथा आजच्या तरुणाईचा एक वेगळा जोश आणि उत्साह दाखवणारी आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि आकांक्षेचा बोईलिंग पॉईंट वाईट मार्गाच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि तत्त्वांची जाण करून देणारा, आजच्या पिढीला आवडेल असा हा सिनेमा येत्या १५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

गावाच्या प्रगतीसाठी आणि गावकऱ्यांसाठी शहिद झालेल्या वडिलांच्या मुलाचा संघर्ष या सिनेमात चित्रित करण्यात आला आहे. बॉडीबिल्डिंग मध्ये मिस्टर एशिया असलेल्या सिद्धांतने चित्रपटासाठी  स्वतः स्टंट दिलेले आहेत. पिळदार शरीरयष्टी असलेला हिरो या 'शिवा'च्या निमित्ताने पाहावयास मिळणार आहे.