आपला सिद्धू' म्हणून लोकप्रिय असणारा सिद्धार्थ जाधव हा चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील एक बहुमुखी कलाकार आहे. कॉमेडी किंग म्हणून सिद्धार्थने खास ओळख मिळवली आहे. अभिनयासोबत आपल्या स्टाईलने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. त्याचा चाहतावर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. सिद्धू हा नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. अशातच सिद्धूनं एका मुलाखतीत नागराज मुंजळे यांच्यासमोर ऑडिशन देताना काय अवस्था झाली होती, याबद्दल सांगितलं.
सिद्धार्थ लवकरच नागराज मुंजळे यांच्या 'मटका किंग' या हिंदी वेब सीरिजमधून झळकणार आहे. सिद्धार्थनं अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये 'मटका किंग'साठी दिलेल्या ऑडिशनचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, "मला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याबरोबर काम करायचं होतं. एक दिवस त्यांचा फोन आला की, पुण्याला येऊन फक्त एक ऑडिशन देऊन जा. मी इतक्या वर्षांमध्ये कधी ऑडिशन दिलं नव्हतं आणि मी ऑडिशनच्या भानगडीत पडायचो नाही. पण, यावेळी मी ऑडिशनसाठी गेलो. मला तेव्हा दरदरून घाम फुटला होता".
पुढे तो म्हणाला, "त्यांनी मला एक टी शर्ट दिला होता, तो पूर्ण भिजला होता. नागराज मंजुळेंनी सांगितलं होतं की हा रोल सिद्धार्थ जाधवच करेल. पण आम्हाला त्याचं ऑडिशन बघायचं आहे. तेव्हा मी त्यांच्या शब्दाखातर तीन वेळा ऑडिशन दिलं. पण, नीट जमत नव्हतं म्हणून मी त्यांना सॉरीसुद्धा म्हणालो. ते म्हणाले काही हरकत नाही, होईल. मला असं वाटतं की असं कधी-कधी कलाकाराबरोबर घडलं पाहिजे. मी करेन रे, होऊन जाईल फक्त असं बोलून नटाचं काही होत नाही". दरम्यान 'मटका किंग' ही वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि यात सिद्धार्थसोबत विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा आणि गुलशन ग्रोवर यांच्याही भूमिका आहेत.
सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'आता थांबायचं नाय' या चित्रपटात झळकला. हा चित्रपट १ मे २०२५ या दिवशी प्रदर्शित झाला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१६ साली घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसोबत भरत जाधव ओम भूतकर आणि प्राजक्ता हनमघर यांसारख्या कलाकारांची मांदियाळी आहे. सिद्धार्थचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट तसेच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचे अपडेट्सही सिद्धार्थ सोशल मीडियावर चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो.