Join us

"मांजरेकर सर माझ्या आयुष्यातील 'बापमाणूस'", सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 10:03 IST

सिद्धार्थ हा महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. सिद्धार्थ हा महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला. त्यावेळी त्याने महेश मांजरेकर आणि आपल्या भूमिकेबद्दल मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, "हे वर्षच खूप खास आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' याचे सगळे श्रेय महेश मांजरेकर सरांना जाते. हा उत्तम सिनेमा, उत्तम विषय आहे. भव्य-दिव्य सिनेमा, कंटेंट, मनोरंजन, प्रबोधन असं सगळं काही या चित्रपटात आहे". तो पुढे म्हणाला, "यामध्ये माझी एक छोटी भूमिका आहे, याचा मला आनंद आहे. २३ ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसादिवशी चित्रपटाचं पोस्टर आलं होतं, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली".

विनोदी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थने या चित्रपटातील आपल्या भूमिकेचं संपूर्ण श्रेय महेश मांजरेकर यांना दिलं. सिद्धार्थ जाधव म्हणाला, "माझ्या भूमिकेचं श्रेय हे महेश सरांना जातं. कारण, ते पात्र त्यांनीच डिझाइन केलं आहे. विनोदी काम तर मी नेहमीच करतो आणि कायमच करत राहणार. पण, विनोदाच्या पलीकडे जाऊन तू काम करू शकतोस, तुझ्यामध्ये ते टॅलेंट आहे, हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला". 

वळ एका भूमिकेसाठी नव्हे, तर प्रत्येक वेळी मांजरेकर सरांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सिद्धार्थने कृतज्ञता व्यक्त केली. सिद्धार्थने महेश मांजरेकर यांच्यासोबत काम केलेल्या चित्रपटांचा उल्लेख करत म्हटलं, "'कुटुंब', 'लालबाग परळ', 'शिक्षणाचा आयचा घो', 'दे धक्का', या सगळ्या सिनेमांमध्ये त्यांनी मला विविध भूमिका दिल्या. त्यांनी इतकी वर्षे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. मी काहीतरी करू शकतो, असं त्यांना नेहमीच वाटतं. ते माझ्यावर विश्वास टाकतात, तेव्हा जबाबदारी वाढते. पण, कारायला मजा येते. हे पात्र साकारताना मजा येते".

 सिद्धार्थ म्हणाला, "ते माझ्या आयुष्यातील 'बापमाणूस' आहेत. त्यामध्ये काही दुमत नाही. मला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आहे. मी फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं नाही, काम करत-करत शिकत आलो आहे. प्रत्येक चित्रपटाच्या वेळी ते मला मार्गदर्शन करत असतात, त्यातूनच मी शिकत असतो. कॅमेऱ्याचा अभिनय मला अजूनही येत नाही. पण मी काम करतो. सर म्हणतात तेच तू काम करत राहा, चौकटीत अडकू नकोस. बऱ्याच गोष्टी ते मला सांगत असतात. म्हणजे दे धक्कापासून हा प्रवास सुरू झाला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा तू हसतोस, तेव्हा लोक हसतात आणि जेव्हा तू रडतोस, तेव्हा ते लोकांना जाणवतं. त्यांना एखादा कलाकार आवडतो म्हणून त्यांच्या सिनेमात नसतो. तर तो त्या पात्राच्या योग्यतेचा असतो, म्हणून तो कलाकार तिथे असतो" असे म्हणत सिद्धार्थने महेश मांजरेकरांबद्दलचा आदर व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Siddharth Jadhav expresses gratitude, calls Manjrekar 'father figure'.

Web Summary : Siddharth Jadhav credits Mahesh Manjrekar for his role in 'Punha Shivajiraje Bhosle.' He appreciates Manjrekar's trust, guidance, and diverse roles offered throughout his career, considering him a 'father figure'.
टॅग्स :सिद्धार्थ जाधवमहेश मांजरेकर