Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थची आई अभिनेत्रीशिवाय आहे उद्योजिका, सुरू केला नवा व्यवसाय; अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिलं प्रोत्साहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 18:22 IST

सीमा चांदेकर यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर स्वत:चा नवा व्यवसाय सुरू केला आहे. आईच्या या नव्या उद्योगाला सिद्धार्थनेही प्रोत्साहन दिलं आहे.

सिद्धार्थ चांदेकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यादेखील एक अभिनेत्री आहेत. आईच्या पावलावर पाऊल टाकत सिद्धार्थने अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. काही दिवसांपूर्वीच सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलं. आईच्या या धाडसी निर्णयाला सिद्धार्थनेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. आता पुन्हा सिद्धार्थने आईच्या एका निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

सीमा चांदेकर यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर स्वत:चा नवा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी दिवाळीनिमित्त घरगुती फराळ विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आईच्या या नव्या उद्योगाला सिद्धार्थनेही प्रोत्साहन दिलं आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर याची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर करत "ह्या दिवाळीत... आईच्या हातची चव! घरगुती फराळ. माझ्या आईकडून तुम्हा सगळ्यांना. त्वरित ऑर्डर करा," असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत सीमा चांदेकर यांना नव्या उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या आहात. 

सिद्धार्थची आई सीमा यांनी अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. गेली कित्येक वर्ष त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सिद्धार्थला आईकडूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. सिद्धार्थची पत्नी मिताली मयेकरही उत्तम अभिनेत्री आहे. सिद्धार्थ-मिताली ही कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे.  

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी