श्रुती मराठे आणि सुबोध भावेची जोडी पुन्हा झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 15:50 IST
श्रुती मराठी आणि सुबोध भावे या दोघांनी बंध नायलॉनचे या चित्रपटात काम केले होते. या दोघांची या चित्रपटातील केमिस्ट्री ...
श्रुती मराठे आणि सुबोध भावेची जोडी पुन्हा झळकणार
श्रुती मराठी आणि सुबोध भावे या दोघांनी बंध नायलॉनचे या चित्रपटात काम केले होते. या दोघांची या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती आणि आता ते दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. श्रुतीनेच ही बातमी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवरून तिच्या फॅन्सना दिली आहे. तिने तिचा आणि सुबोधचा एक छानसा फोटो पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले आहे. तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, माझा नवीन चित्रपट, नवीन दिवस पण जुना मित्र. या कॅप्शनवरून ते दोघे चित्रपटात एकत्र काम करत असल्याचे तिने सांगितले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दुबई येथे सुरू असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधीचा एक व्हिडिओदेखील श्रुतीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची हेअर ड्रेसर तिचे केस सेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावरून या चित्रपटातील श्रुतीचा लूकदेखील वेगळा असणार असल्याची चर्चा आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने अशाप्रकारे केस सेट करणे हे टॉर्चर असल्याचे म्हणत हसतानाच्या अनेक स्मायलीदेखील पोस्ट केल्या आहेत. श्रुती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत तिच्या फॅन्सना तिच्या या नवीन चित्रपटाबाबत माहिती देत आहे. यातूनच ती या चित्रपटाबाबत खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. श्रुती दुबईत नव्या चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याने सध्या खूप खूश आहे. पण त्याचसोबत ती आनंदित असल्याचे आणखी एक कारण आहे. श्रुती तिच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटला नेहमीच खूपच अॅक्टिव्ह असते आणि नुकतेच तिचे फेसबुक अकाऊंट व्हेरिफाइड झालेले आहे.