मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मधू कांबीकर यांचा आज वाढदिवस आहे. मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार त्यामुळे मधू लहान असल्यापासूनच ते त्यांना आपल्या सोबतच घेऊन जात असत. तेव्हापासूनच त्यांच्या अभिनयाची जडणघडण होत गेली आणि त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. आपल्या कौशल्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले.
इतकेच नाही तर लावणीच्या चाहत्यांना लावणीचा इतिहास उमजावा यासाठी त्यांनी लावणी संदर्भातील जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून तमाशाचा इतिहास गुंफण्याचे कार्य घडवून आणले. यात त्यांच्या फडातील ११ कलाकारांनी मोठी मदत केली. यावर आधारित ” सखी माझी लावणी ” हा कार्यक्रम त्यांनी सादर केला. पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. १९८२ सालच्या शापित चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. इथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली.
२०१८ साली झी चित्र गौरव पुरस्कारावेळी मधू कांबीकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मधू कांबीकर यांची सून शीतल जाधव यांनी त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यावेळी शीतल जाधव यांनी आपल्याला अशी सासू मिळाली हे माझे भाग्य असल्याचे सांगितले होते. मधू कांबीकर आजारापणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला कुठलीही प्रतिक्रिया किंवा हालचाल करत नाहीत. मात्र त्यांचे एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू यासारखे चित्रपट जेव्हा घरात टीव्हीवर लावले जातात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.