मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने रसिकांच्या मनात घर केले आहे. सई सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंंती देखील मिळत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी तिने चाहत्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरेदेखील दिली.
एका चाहत्याने तिला सिनेइंडस्ट्रीत महिला आणि पुरुष कलाकारांमध्ये भेदभाव न करता त्यांना समान संधी आणि समान मोबदला दिला जातो का असा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सईने दिले. तिने सांगितले की, 'सिनेइंडस्ट्रीत महिला आणि पुरुष कलाकारांना मानधन देताना फार मोठा भेदभाव केला जातो. त्याचप्रमाणे त्यांना मिळणाऱ्या संधींमध्ये देखील खूप मोठी तफावत असते. मात्र आता ओटीटीमुळे यामध्ये खूप फरक पडला आहे.'
सई ताम्हणकरने पुढे सांगितले की, 'प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. माझ्या आयुष्यात काही दिवस असे होते की तेव्हा मी स्वतःला अजिबात कणखर मानत नव्हते. इतकेच नाही तर माझा स्वतःवरही अजिबात विश्वास नव्हता. परंतु आजचे दिवस वेगळे आहेत. थोडक्यात या सगळ्यावर तुमचा विश्वास असायला हवा.'
वर्कफ्रंट
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. या शोमध्ये तिच्याबरोबर प्रसाद ओक देखील परीक्षक आहे. तिचा 'पाँडेचेरी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले आहे. या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत वैभव तत्त्ववादी मुख्य भूमिकेत आहे.