Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. श्रीराम लागू यांच्या मुलासोबत घडला होता खूपच धक्कादायक प्रसंग, वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:36 IST

डॉ. श्रीराम लागू यांच्या मुलासोबत घडलेला प्रसंग खूपच धक्कादायक होता.

मराठी चित्रपटसृष्टीतील नटसम्राट म्हणजेच अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे डिसेंबर, २०१९ला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी अभिनयाद्वारे साकारलेली प्रत्येक कलाकृती प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. श्रीराम लागू यांना एक मुलगा होता, ज्याचे एका अपघातात निधन झाले.  

 १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे डॉ. श्रीराम लागू यांनी जन्म घेतला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी डॉक्टरकीची पदवी घेतली. कॅनडा येथे जाऊन त्यांनी पुढील पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी विविध नाटकांत काम केले होते.

डॉ श्रीराम लागू हे मूळचे कान, नाक, घसा शल्यविशारद मात्र आपला व्यवसाय सोडून ते अभिनयाकडे वळले.  १५० हून जास्त हिंदी मराठी चित्रपट, ४० हून अधिक हिंदी, मराठी, गुजराती व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. सिंहासन, पिंजरा, झाकोळ या चित्रपटांसोबत हिमालयाची सावली, नटसम्राट, वेड्याचे घर उन्हात, सूर्य पाहिलेला माणूस, गिधाडे ही त्यांची नाटके गाजली.

डॉ. श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू यादेखील रंगभूमीवरील जाणत्या कलाकार. त्यांना तन्वीर नावाचा मुलगा होता. तन्वीरचा ९ डिसेंबर १९७१ साली जन्म झाला. कामानिमित्त तो पुणे मुंबई मार्गे रेल्वेने प्रवास करत होता. खिडकी शेजारी बसून पुस्तक वाचत असताना बाहेरून कोणीतरी फेकलेला दगड थेट त्याच्या डोक्याला लागला. त्यामुळे जोरदार आघात होऊन तन्वीर कोमामध्ये गेला; त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान एका आठवड्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचा खूप मोठा धक्का डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांना बसला होता. त्यांना त्यातून सावरणे खूप कठीण झाले होते.

तन्वीरच्या आठवणीत त्याच्या जन्मदिनी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार नावाने जेष्ठ नाट्यकर्मींना त्यांच्या विशेष योगदानासाठी पुरस्कृत केले जाते. यातून भारतभरातील रंगभूमीवरील कलाकारांना त्यांच्या रूपवेध या संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. 

टॅग्स :श्रीराम लागू