Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हिरकणी' चित्रटातील शिवराज्याभिषेकाचे भव्यदिव्य गाणं लाँच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 11:17 IST

शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता दर्शवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. 

शिवराज्याभिषेकावर आतापर्यंत अनेक गाणी आली. मात्र, प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचे गाणे या सर्व गाण्यांमध्ये वेगळे ठरणार आहे. कारण नऊ मराठी कलाकार, सहा लोककला प्रकारांचा या एकाच गाण्यात समावेश आहे. नुकतंच हे भव्यदिव्य असं गाणं लाँच करण्यात आलं आहे. राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. "कच्चा लिंबू" या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर प्रसाद ओकचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. 

अभिनेता चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, क्षिती जोग, राजश्री ठाकूर संगीतकार राहुल रानडे या गाण्यात दिसत आहेत. तर ओवी, पोवाडा, कव्वाली, अभंग, धनगर, शेतकरी अशा सहा पारंपरिक लोककलांचा या गाण्यात समावेश आहे. शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता दर्शवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. 

या गाण्याचं लेखन कविभूषण, संदीप खरे यांनी केलं असून, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दीपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव चाटी, संतोष बोटे  या नवोदित गायक आणि गायिकांच्या सुमधुर आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. चित्रपटाचे लेखन चिन्मय मांडलेकर, छायाचित्रण संजय मेमाणे तर कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. सुभाष नकाशे ह्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

शिवराज्याभिषेकाचा सोहळा चित्रपटातील भाग आहे. त्याची भव्यता गाण्यातून दिसावी हा प्रयत्न होता. तसंच विविध पैलू उलगडण्याचाही विचार होता. त्यासाठी या वेगळ्या पद्धतीनं गाणं करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंतच्या शिवराज्याभिषेकाच्या गाण्यांत हे गाणं निश्चितपणे वेगळं ठरेल,' असं दिग्दर्शक प्रसाद ओकनं सांगितले.

टॅग्स :प्रसाद ओक