‘फर्जंद’मध्ये चमकणार शिवकालीन नायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 10:21 IST
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत अनेक शूर शिलेदारांचा सहभाग होता.त्यांच्या अतुलनीय शौर्याने आणि त्यागाने स्वराज्य स्थापन झाले.यापैकीच ...
‘फर्जंद’मध्ये चमकणार शिवकालीन नायक
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत अनेक शूर शिलेदारांचा सहभाग होता.त्यांच्या अतुलनीय शौर्याने आणि त्यागाने स्वराज्य स्थापन झाले.यापैकीच एक असलेल्या ‘कोंडाजी फर्जंद’च्या शौर्याची कथा ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या अनुषंगाने शिवकालीन इतिहासातील काहीसे ओळखीचे परंतु कधीही प्रभावीपणे समोर न आलेल्या नायकांचे चेहरे जगासमोर येणार आहेत.‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती असलेला ‘फर्जंद’ १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचेनिर्माते अनिरबान सरकार असून संदीप जाधव,महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार सहनिर्माते आहेत. जीवाची तमा न बाळगता प्राणपणाने लढणाऱ्या कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा ‘फर्जंद’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर या नवोदित दिग्दर्शकाने पडद्यामागे राहिलेले नायक ‘फर्जंद’ या सिनेमात समोर आणण्याचं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि कोंडाजी फर्जंद या नायकाच्या भूमिकेत अंकित मोहनला सादर करताना इतर व्यक्तिरेखांसाठीही दिग्पालने दिग्गज कलाकारांची निवड केली आहे.या सिनेमात अजय पुरकरने मोत्याजी मामा साकारले आहेत, तर आस्ताद काळे गुंडोजी बनलाय... राहुल मेहेंदळे अनाजी पंतांच्या भूमिकेत दिसणार असून,राजन भिसे हिरोजी इंदुलकर बनले आहेत.हरीश दुधाडे यांनी गणोजीची व्यक्तिरेखा साकाली असून,प्रवीण तरडेने मारत्या रामोशी ही महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे.यासोबतच अंशुमन विचारेने भिकाजीच्या भूमिकेत रंग भरला आहे.या सर्व व्यक्तिरेखा प्रभावीपणे पडद्यावर सादर व्हाव्यात या उद्देशाने दिग्पालने मराठीतील आघाडीच्या कलाकारांची निवड केली आहे. याबाबत बोलताना दिग्पाल म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अनेक शिलेदारांचं मोलाचं योगदान आहे. मोत्याजी मामा, गुंडोजी, अनाजी पंत, हिरोजी इंदुलकर, गणोजी, मारत्या रामोशी, भिकाजी यांचाही त्यात समावेश आहे.‘फर्जंद’ या सिनेमात कोंडाजीच्या कथा असली तरी कोंडाजीप्रमाणेच स्वराज्याच्या जडणघडणीत सहभागी असलेल्या तत्कालीन नायकांचं कार्य समोर यावं या उद्देशाने त्यांच्यावर फोकस केला आहे. यांच्या भूमिका फार मोठ्या नसल्या तरी त्या प्रभावीपणे मनावर ठसतील याची दक्षता घेण्यात आल्याचंही दिग्पाल म्हणाला.नितीन चंद्रकांत देसाई यांनी कलादिग्दर्शन केलं आहे, तर निखील लांजेकर यांनी ध्वनीलेखनाचं काम पाहिलं आहे.१ जून रोजी फर्जंद सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.