Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मोठ्या पडद्यावर लवकरच साजरा होणार 'शिमगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 19:53 IST

फाल्गुन महिन्यात येणारी होळी म्हटली, कि चाकरमान्यांच्या डोळ्यासमोर येते ती शिमग्याची पालखी! सध्या सगळं कोकण या शिमग्याच्या उत्साहात रंगलं ...

फाल्गुन महिन्यात येणारी होळी म्हटली, कि चाकरमान्यांच्या डोळ्यासमोर येते ती शिमग्याची पालखी! सध्या सगळं कोकण या शिमग्याच्या उत्साहात रंगलं आहे. प्रत्येक कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा हा 'शिमगा' लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. श्री केळमाई भवानी प्रोडक्शन्स निर्मित 'शिमगा' या आगामी चित्रपटात कोकणातील पारंपारिक शिमगोत्सवाचा समृद्ध अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. निलेश क्रिष्णा दिग्दर्शित आणि लिखित या सिनेमाचा होळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आलेल्या या टीझर पोस्टरवर सैनिकी पोशाखातले राजेश शृंगारपुरे आणि भुषण प्रधान हे दोन प्रमुख अभिनेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिमगोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई, पुण्यांसारख्या शहरात राहाणारी मंडळीदेखील शिमण्याला आवर्जून कोकणातील आपल्या घरी परततात. भारतातील विविध भागातील लोक हा शिमगा पाहाण्यासाठी आवर्जून कोकणात जातात. हाच शिमगा प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या चित्रपटाच्या टीझरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.'शिमगा' या सिनेमाला पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून, गीतलेखन गुरू ठाकूर आणि वलय यांनी केले आहे. 'शिमगा' या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा कोकणी संस्कृतीवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.भुषण प्रधानने घे भरारी या त्याच्या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. संस्कृती या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेमुळे भुषणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मालिकेशिवाय सतरंगी रे, टाईमपास, कॉफी आणि बरंच काही, टाइम बरा वाईट यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत तर राजेश शृंगारपुरेने झेंडा, युद्ध यांसारख्या मराठी तर डॅडी, मर्डर ३, सरकार राज यांसारख्या हिंदी चित्रपटातदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ते दोघेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल अशी या चित्रपटाच्या टीममधील मंडळींना खात्री आहे.