शर्मिष्ठा राऊत झळकणार GST एक्सप्रेसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:34 IST
शर्मिष्ठा राऊतने मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत साकारलेली नीरजाची भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत ती एका नकारात्मक भूमिकेत ...
शर्मिष्ठा राऊत झळकणार GST एक्सप्रेसमध्ये
शर्मिष्ठा राऊतने मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत साकारलेली नीरजाची भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत ती एका नकारात्मक भूमिकेत दिसली असली तरी प्रेक्षकांनी तिची भूमिका डोक्यावर घेतली होती. त्यानंतर ती उंच माझा झोका, जुळून येती रेशीमगाठी यांसारख्या मालिकेत झळकली. तिने योद्धा, नवरा माझा भोवरा यांसारख्या चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. जो भी होगा देखा जायेगा हे तिने शेखर फडकेसोबत नाटक देखील केले होते. या नाटकात तिचा कॉमिक सेन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखून हसवण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ती कॉमेडीची GST एक्सप्रेसमध्ये झळकणार आहे. तिच्यासोबतच प्रेक्षकांना आशिष पवार, कमलाकर सातपुते, किशोर चौघुले, अदिती सारंगधर आणि प्राजक्ता हनमघर हे त्यांचे लाडके विनोदवीर पाहायला मिळणार आहेत. GST म्हणजे गायब सगळं टेन्शन. ही एक्सप्रेस सगळ्यांना १०० टक्के हसण्याची हमी देणार आहे. या कार्यक्रमामध्ये गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते मार्गदर्शकाच्या अथवा परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार नसून तो कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक असणार आहे. अवधूत या कार्यक्रमामध्ये असलेल्या विनोदवीरांसोबत हसणार आहे, गाणार आहे, त्यांच्या उत्तम विनोदांना दाद देखील देणार आहे. तसेच या कलाकारांना प्रोत्साहन देणार आहे.प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती संतोष काणेकर यांच्या अथर्व थिएटर्सने केली आहे. तसेच ज्ञानेश भालेकर यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. दर्जेदार आणि निखळ विनोदाची मेजवानी देण्याचा हेतू लक्षात घेऊन हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला आहे. Also Read : GST चा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?