मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपटामध्येही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या त्यांनी साकारल्या आहेत. आता शरद पोक्षे यांचा मुलगा स्नेह हा देखील 'बंजारा' या सिनेमातून दिग्दर्शनात आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. अशा वेळी शरद पोंक्षेंनी त्याला दिलेला सल्ला सध्या चर्चेत आहे.
नुकतंच शरद पोंक्षे यांनी मुलासोबत 'राजश्री मराठी शोबझ'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बाप-लेकानं एकमेंकाविषयीच्या काही खास गोष्टी सांगितल्या. शरद पोंक्षे म्हणाले, "मी त्याला सांगितलंय की या क्षेत्रात दोन बा पासून लांब राहायचं, एक म्हणजे बाई आणि दुसरी बाटली. या दोन गोष्टी करिअरची वाट लावतात. बाईच्या नादाला लागलास की वाट लागते आणि बाटलीच्या नादाला लागलास की वाट लागते. प्रेम कर एखादीवर, पण मग ते निष्ठेने केलेलं प्रेम पाहिजे. दर दोन वर्षांनी प्रेम बदलत राहील असं काही करू नकोस, त्याला प्रेम म्हणत नाही. नाहीतर वाटोळ होईल", असा सल्ला लेकाला दिल्याचं सांगितलं.