शरद पोंक्षे झळकणार कनिकामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 13:13 IST
शरद पोंक्षे यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अग्निहोत्र, वादळवाट यांसारख्या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी काम ...
शरद पोंक्षे झळकणार कनिकामध्ये
शरद पोंक्षे यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अग्निहोत्र, वादळवाट यांसारख्या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी काम केले आहे. अग्निहोत्र या मालिकेतील त्यांची भूमिका तर प्रचंड गाजली होती. तसेच मोकळा श्वास, तप्तपदी यांसारख्या मराठी चित्रपटातदेखील ते झळकले आहेत. एक अतिशय चांगले अभिनेते म्हणून शरद पोंक्षे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे नथुराम गोडसे हे तर प्रचंड प्रसिद्ध आहे. या नाटकाचा विषय हा खूप वेगळा असल्याने हे नाटक चांगलेच वादात अडकले होते. पण तरीही या नाटकाचे आतापर्यंत अनेक प्रयोग झाले आहेत. एवढेच नव्हे तर ब्लॅक फ्रायडे, हे राम यांसारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.शरद पोंक्षे प्रेक्षकांना आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. कनिका या त्यांच्या आगामी चित्रपटात ते एका वेगळ्याच व्यक्तिरेखेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेची सध्या चांगलीच चर्चा आहे. कनिका हा एक भयपट असणार आहे. या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे यांच्यासोबत चैत्राली गुप्ते प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. चैतालीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सत्ताधीश या नाटकामुळे ती नावारूपाला आली. चैताली ही अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची बहीण तर अभिनेता लोकेश गुप्तेची पत्नी आहे.कनिका या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर मनोहर करत असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.