Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रयोगोत्सवात रंगल्या महाराष्ट्रातील सात सर्वोत्कृष्ट एकांकिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:41 IST

आंतरमहाविद्यालयीन आणि खुल्या एकांकिका स्पर्धांचा आवाका गेल्या कित्येक वर्षात वाढलेला आहे. नाट्यरसिकांचे एकांकिकांवरचे वाढते प्रेम लक्षात घेता विविध स्तरावर ...

आंतरमहाविद्यालयीन आणि खुल्या एकांकिका स्पर्धांचा आवाका गेल्या कित्येक वर्षात वाढलेला आहे. नाट्यरसिकांचे एकांकिकांवरचे वाढते प्रेम लक्षात घेता विविध स्तरावर एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमधून अनेक एकांकिका गाजतात. या सर्वोत्कृष्ट एकांकिका एकाच व्याससपीठावर पाहता याव्यात याकरता इलेव्हन अवर्स प्रोडक्शनने 'प्रयोगत्सवा'चे आयोजन केले होते. मंगळवारी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात प्रयोगत्सव संपन्न झाला, यावेळी एकूण सर्वोत्कृष्ट सात एकांकिकांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन देवदत्त साबळे, हृदयनाथ राणे, समीर चौघुले, अनुराधा राजाध्यक्ष आणि प्रा.डॉ.गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.चँनेल पार्टनर झी युवा असलेल्या या प्रयोगोत्सवाचे हे यंदाचे दुसरे वर्ष होते. वर्षभरात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सात एकांकिका यावेळी दाखवण्यात आल्या. महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘शुभयात्रा’, नाट्यवाडा प्रस्तुत ‘मॅट्रिक’, औरंगाबादमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची ‘माणसं’, कवडसा प्रोडक्शन प्रस्तुत ‘पॉज’, सिडनॅहम महाविद्यालयाची ‘निर्वासित’, पुण्यातील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची ‘सॉरी परांजपे’ आणि रॉ प्रोडक्शनची ‘डॉल्बी वाजलं की धडधड’ आदी दर्जेदार एकांकिका यावेळी सादर करण्यात आल्या. या सातही एकांकिकांनी वर्षभरात नाट्यप्रेमींसोबतच अनेक दिग्गज कलाकारांना मंत्रमुग्ध केले होते. त्यामुळे या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एकांकिकांचे शेवटचे प्रयोग पाहण्यासाठी अनेक रसिकांनी गर्दी केली होती. प्रयोगोत्सवामुळे कलाकारांना आपली कलाकृती दिग्गज कलाकारांसमोर सादर तर करता आलीच शिवाय अनेक दिग्गज रंगकर्मींचा स्वहाताने गौरवही करता आला. या नवोदित कलाकारांच्या हस्ते नाट्यक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सात रंगकर्मींचा सत्कार करण्यात आला. अशोक पालेकर, जयराज नायर, अरुण काकडे, विद्याताई पटवर्धन, सविता मालपेकर, शरद सावंत आणि शितल शुक्ल आदी दिग्गज रंगकर्मींना गौरवण्यात आले. एवढेच नव्हे तर प्रत्येक एकांकिकेलाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या सन्मानचिन्हाचीही एक वेगळी खासियत आहे. प्रत्येक एकांकिकेचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याआधारे सन्मानचिन्हं तयार करण्यात आली आहेत.एकांकिकांमधून कामं करून चित्रपट, मालिका आणि नाट्यक्षेत्रात आपलं करिअर घडवणारे अनेक कलाकारही यावेळी उपस्थित होते. हर्षद अतकरी, भक्ती देसाई, तितिक्षा तावडे, श्वेता पेंडसे, अरुण कदम, समीर चौघुले, ऋजुता धारप, ओंकार राऊत, राजेंद्र चावला, भक्ती रत्नपारखी, अमृता देशमुख, विद्याधर जोशी, चिन्मयी सुमीत, सीमा देशमुख, संग्राम साळवी, कौमुदी वाळोकर, मनमित पेम, पौर्णिमा केंडे, ऋतुजा बागवे, प्रमोद पवार, प्रताप फड, स्नेहा रायकर, सुयश टिळक, पल्लवी पाटील, श्रुती अत्रे असे अनेक कलाकार एकांकिकेतील कलाकरांचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहिले होते. ​