पिफसाठी झाली १४ चित्रपटांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 12:27 IST
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या ...
पिफसाठी झाली १४ चित्रपटांची निवड
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या चित्रपटांच्या नावांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली. येत्या १२ ते १९ जानेवारी, २०१७ दरम्यान होणा-या या महोत्सवातील चित्रपटांची अधिक माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पटेल बोलत होते.महोत्सवाचे क्रिएटिव्ह हेड व चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, पिफ बझारचे समन्वयक श्रीरंग गोडबोले, अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.पत्रकार परिषदेत वर्ल्ड कॉम्पिटिशन अंतर्गत निवड झालेल्या जगभरातील १४ चित्रपटांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये ‘लेडी ऑफ दी लेक’ या हौबम पबन कुमार दिग्दर्शित भारतीय चित्रपटाचाही समावेश आहे. याबरोबरच स्टुडण्ट कॉम्पिटिशनमध्ये लाईव्ह अॅक्शन व अॅनिमेशन असे दोन भाग असून यातील लाईव्ह अॅक्शन विभागात १३ तर अॅनिमेशन विभागात १६ चित्रपटांचा समावेश आहे.यावर्षी लाईव्ह अॅक्शन विभागात ४ भारतीय चित्रपटांचा समावेश असून त्यापैकी ‘अंधेरे मैं’ आणि ‘कल्पवृक्ष’ हे दोन चित्रपट पुण्यातील भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अर्थात एफटीआयआय या संस्थेतील विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत हे विशेष. तर अॅनिमेशन विभागात सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित केलेला ‘टमलिंग स्ट्रीट’ व व्हिस्लींग वूड्स इंटरनॅशनलच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे. यावर्षी कंट्री फोकस विभागात अर्जेंटीना व व्हिएतनाम या दोन देशांतील चित्रपट पाहता येणार असून याबरोबरच रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात आंद्रे वायदे आणि अपर्णा सेन यांचे चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.