Join us
Daily Top 2Weekly Top 5

घुमा पाहण्यासाठी बच्चेकंपनीची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 11:30 IST

मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या आणि शिक्षण घेत असलेल्या सर्वांचेच मनोबल वाढवणारा महेश काळे दिग्दर्शित घुमा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित ...

मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या आणि शिक्षण घेत असलेल्या सर्वांचेच मनोबल वाढवणारा महेश काळे दिग्दर्शित घुमा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी ठिकठिकाणी शालेय गणवेशातील मुलांनी शाळा ते सिनेमागृहापर्यंत प्रभात फेरी काढून सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली. अहमदनगरसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये आज सिनेमा पाहण्यासाठी शाळा-शाळांतून विद्यार्थी सिनेमागृहात दाखल झाले. घुमाच्या नावाचा जयघोष करत बच्चेकंपनी सिनेमागृहात दाखल होत होती. इतक्या मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी सिनेमा पाहायला येण्याची ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच वेळ असेल.त्याला कारणही तसेच आहे. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानदारी जोराने वाढली आहे. सरकारी आणि खाजगी सर्वच मराठी शाळांच्या मुळावर या शाळा घाव घालत आहेत. इंग्रजी भाषेतून संभाषण करता येण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले पाहिजे, असा गैरसमज सध्या सर्वांचाच झालेला आहे. इंग्रजी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही ते प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही पालक मुलांना मराठी माध्यमातून काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दाखल करत आहेत. त्यात विद्यार्थांचे प्रचंड नुकसान तर होतच आहे. पण महानगरांप्रमाणे ग्रामीण भागातील मराठी शाळांनाही घरघर लागली आहे.  नेमका हाच मुद्दा प्रमोशनमधून पटवण्यात घुमाची टीम यशस्वी झाली, असे म्हणता येईल. कारण, आज ज्या शाळांमधून विद्यार्थी घुमा हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी करत आहेत. त्या शाळांनाही या पेव फुटलेल्या इंग्रजी शाळांमुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे आपले आणि आपल्या शाळेतील मुलांच्या मनातील न्युनगंड दूर करण्यासाठी आणि मराठी शाळेत शिकत असल्याचा अभिमान दुणावण्यासाठी घुमा हा सिनेमा पाहण्याची त्यांना गरज वाटली आहे.विद्यार्थ्यांची सिनेमागृहाकडे निघालेली प्रभातफेरी पाहून स्थानिक तसेच गावकरीही सिनेमागृहाकडे वळत आहेत. वणवा पेटला आणि इंग्लिश शिकवून सोडा या गाण्यांमुळे आधीच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. Also Read : सलमान खानप्रमाणेच हा मराठीतील अभिनेता देखील लग्न करण्यापासून पळतोय