see pic : शशांक केतकरने गुपचूप उरकला साखरपुडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 16:06 IST
प्रियांका ढवळे या मैत्रिणीलाच शशांक केतकरने आयुष्याची जोडीदार म्हणून निवडले आहे. नुकताच शशांक व प्रियांकाचा साखरपुडा पार पडला.
see pic : शशांक केतकरने गुपचूप उरकला साखरपुडा!
तुमचा आमचा लाडका अभिनेता शशांक केतकर याच्या आयुष्यात प्रेम परतल्याची चाहुल आपल्याला कधीचीच लागली होती. गत व्हॅलेन्टाईन डेला शशांकच्या फेसबुक प्रोफाईलवरचा फोटो बघून शशांक पुन्हा प्रेमात पडल्याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता. आता हा अंदाज खरा ठरला आहे. होय, प्रोफाईल फोटोमध्ये असलेल्या प्रियांका ढवळे या मैत्रिणीलाच शशांकने आयुष्याची जोडीदार म्हणून निवडले आहे. नुकताच शशांक व प्रियांकाचा साखरपुडा पार पडला. प्रियांकाही शशांकची खास मैत्रिण आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शशांक व प्रियांकाच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. शिवाय दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वीही शशांकने प्रियांकासोबतचा फोटो फेसबुक प्रोफाईलवर टाकला तेव्हा अमृताने त्यावर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्यावेळी शशांकने प्रियांकावरील प्रेमाची कबुली देणे टाळले होते. प्रियांका केवळ माझी मैत्रिण असल्याचे त्याने म्हटले होते. ‘होणार सून ह्या या घरची’ या मालिकेत शशांकने श्रीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तो घराघरापर्यंत पोहोचला होता. या मालिकेत त्याच्या पत्नीच्या रुपात जान्हवीची व्यक्तिरेखा तेजश्री प्रधानने साकारली होती. श्री आणि जान्हवीची जोडी तुफान लोकप्रीय झाली होती. विशेष म्हणजे, याच मालिकेच्या सेटवर शशांक आणि तेजश्री या दोघांतही रिअल लाईफ प्रेम फुलले होते. यानंतर पडद्यावरील हे नवरा-बायको वास्तवातही एकत्र आले होते. अर्थात त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. एका वर्षात शशांक आणि तेजश्री विभक्त झाले होते. आता शशांक आणि तेजश्री दोघेही भूतकाळ विसरून आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे निघालेत. शशांकने तर आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्याच्या दृष्टीने एक पाऊलही पुढे टाकले आहे. या नव्या वाटचालीसाठी शशांक व प्रियांकाला आपण शुभेच्छा देऊ यात!