Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागराज मंजुळेंसह सयाजी शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 12:15 IST

       महाराष्ट्रीयन ऑफ हैदराबाद' येथील मित्रांगण परिवार आयोजित 'सैराट झालं जी' कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. सैराटचे ...

       महाराष्ट्रीयन ऑफ हैदराबाद' येथील मित्रांगण परिवार आयोजित 'सैराट झालं जी' कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, मराठमोळा आणि तेलगू अभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह आर्ची, सल्ल्या, प्रदीप आणि आनीला पाहण्यासाठी हैदराबादेतील मराठी माणसांनी झिंगाट गर्दी केली होती. यावेळी नागराजसह आर्चीने हैदराबादेतील शुटींगच्या आठवणी जागवत मराठी प्रेक्षकांना खूश केले.         मराठमोळ्या ढंगात तेलगू भूमीवर नागराज आणि सैराटच्या टीमचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथील रविंद्र भारती सभागृहात ढोल-ताशांच्या गजरात, नागराज मंजुळेचे वेलकम येथील मित्रांगण ग्रुपने केले. मित्रांगण ग्रुपसह तेलंगणाचे आयपीएस ऑफिसर महेश भागवत आणि नागराज यांचे बंधू आयएएस बालाजी मंजुळे यांनीही टीम सैराटचे वेलकम केले. सभागृहात सैराट टीमची एन्ट्री होताच, गणपती बाप्पा मोरया, जय भवानी जय शिवाजी, जय महाराष्ट्र या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. त्यानंतर कुचीपुडी नृत्यासह, मराठी गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले.  सैराट चित्रपटातील शुटींगचा काही भाग हैदराबाद येथे शूट करण्यात आला आहे. त्यामुळे येथील मराठीजनांना सैराट सिनेमाचे चांगलेच याड लागल्याचे पाहायला मिळाले. तर नागराज मंजुळे यांनीही हैदराबाद येथे येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. हैदराबादेतील मराठी माणसांची एकता पाहून भारावल्याचे नागराज यांनी म्हटले. तसेच सैराट हा चित्रपट तेलगूतही साकारणार असून त्याचे दिग्दर्शकही नागराज मुंजळे स्वत: करणार आहेत. मात्र, या चित्रपटासाठी कलाकारांची निवड अद्याप करण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. परप्रांतात कार्यक्रमाचा मिळालेला प्रतिसाद नक्कीच आणखी मनोबल वाढवणारा आहे. तर सैराटचे यश पाहून आम्हाला अत्यांनंद होत असल्याचे सर्वच सैराटच्या टीमने म्हटले. यावेळी आर्ची, सल्ल्या आणि बाळ्या उर्फ लंगड्याला पाहण्यासाठी, बोलण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी हैदराबादेतील मराठी माणसांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, विशेष बाब म्हणजे तेलगू आणि हिंदी भाषिक चाहतेही सैराट टीमला पाहण्यासाठी उपस्थित होते. मित्रांगण परिवारेच अखिलेश वाशीकर आणि निलम लहानकर यांसह त्यांच्या टीमने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.