प्रियांका लोंढे
कोणत्याही चित्रपटाचा गाभा हा त्या सिनेमातील गाणी आणि संगीतच असतो. आज आपण बरेच चित्रपट असे पाहिले आहेत की जे फक्त गाण्यांमुळेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मराठी चित्रपट जसा आशयप्रधान होऊ लागला आहे. तसेच आता आपल्याकडे संगीतातही वेगवेगळे प्रयोग होऊ लागले आहेत. आता हेच पाहा ना, डॉ. रखमाबाई राऊत या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळ््या प्रकारचे गाणे ऐकायला मिळणार आहे. गायिका सावनी रवींद्र या गाण्याला आपला आवाज देणार आहे. बहिणाबाई चौधरींची मन वढाळ वढाळ, उभ्या पीकातलं ढोर... ही कविता सावनीने या चित्रपटासाठी एका वेगळ््याच अंदाजात गायली आहे. या गाण्याविषयी सीएनएक्सशी बोलताना सावनी म्हणाली, हे गाण मी पुरुषी आवाजात गायले आहे. अशा प्रकारचा एक वेगळाच प्रयोग करताना खरतर मला मजा आली. आपण नेहमीच एका पठडीतील गाणी गाण्यापेक्षा सतत त्यामध्ये काहीतरी बदल करण्याची गरज असते. मला जेव्हा या गाण्याविषयी सांगण्यात आले तेव्ही मी आधी नॉर्मल आवाजात गायले. नंतर वाटल आपण वेगळ््या प्रकारे ट्राय तरी करून बघुयात. मग आम्ही लगेचच हे रांगड्या आवाजातील गाणे रेकॉर्ड केले. या गाण्याची खासियत म्हणजे, संपूर्ण चित्रपटात हे एकच गाणे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना माझे हे वेगळ््या आवाजातील गाणे नक्कीच आवडेल असे मला वाटते. सावनीच्या या गाण्याला रसिक किती पसंती दर्शवितात हे तर आपल्याला गाणे ऐकल्यावरच समजेल