संतोष जुवेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. संतोषकडेही दरवर्षी गणरायाचं आगमन होतं. संतोष आणि कुटुंबीय एकत्र मिळून दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. यंदाही अभिनेत्याच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. यानिमित्ताने संतोष आणि त्याच्या आईने प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. अशाच एका मुलाखतीत संतोषच्या आईने त्याचं कौतुक केलं.
संतोषच्या आईने सकाळशी बोलताना लेकाचं भरभरुन कौतुक केलं. त्या म्हणाल्या, "माझ्या संतोषचं कौतुक होतंय. गावी म्हणतात लताचा मुलगा इतका मोठा झाला. गावाला गेल्यावर लोक मला म्हणतात की तू मुलाला घडवलंस. त्यांना मी म्हटलं की मी तर घडवलं. पण त्याने स्वत: स्वत:ला घडवलं आहे. त्याने स्वत:ची आवड जपली. त्याला मोठमोठ्या नोकऱ्यांची ऑफरही होती. पण, त्याने नोकरी केली नाही. तो म्हणायचा मला याच्यातच पुढे जायचंय. त्याने आमचं नाव खूप मोठं केलंय. अजूनही त्याने नाव कमवावं. मी एवढंच बाप्पाकडे मागितलंय की संतोषला २०२५मध्ये छावासारखाच मोठा रोल असलेला सिनेमा मिळावा. बाकी भूमिका तर त्याला मिळतातच पण जसा आता हिंदी छावा सिनेमा गाजला. तसा सिनेमा त्याला मिळावा".
दरम्यान, संतोषने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'झेंडा' आणि 'मोरया' या सिनेमांमधून तो घराघरात पोहोचला. विकी कौशलच्या छावा सिनेमामुळे संतोष प्रसिद्धीझोतात आला. या सिनेमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसंच 'छावा' सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत संतोषने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. त्यामुळे त्याला ट्रोलही केलं गेलं होतं.