Santosh Juvekar: 'छावा' या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेला हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात अनेक मराठी कलाकारांची फौज होती. यापैकी संतोष जुवेकरने सिनेमात रायाजीची भूमिका साकारली होती. संतोष जुवेकरने या सिनेमानंतर दिलेल्या एका मुलाखतीत मी औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाकडे बघितलंही नाही, असं वक्तव्य केल्याने त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अनेक मीम्सही व्हायरल झाले होते. यावर संतोषने आता पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत ट्रोलिंगवर भाष्य केलं.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला "२२ वर्षं झाली या क्षेत्रात काम करतोय. पण, त्या गोष्टीमुळे इतकी प्रसिद्धी मिळाली, जी इतक्या वर्ष केलेल्या कष्टातून मिळाली नाही. ज्यांनी ती मुलाखत पूर्ण पाहिली, त्यात मग माझ्या कामाचे चाहते असतील किंवा फॉलोवर्स असतील, त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की, आम्हाला काहीच चुकीचं वाटलं नाही. तू योग्य बोलला आहेस. पण, ज्यांना थोडंसंच बघून ज्यांना पटकण आपलं मत मांडण्याची घाई असते, त्यांनी त्या मुलाखतीतील अर्धवट भाग पाहून 'अरे, बघ हा काय बोलला' असं केलं. परंतु त्यांनी मागचं-पुढचं काहीच पाहिलं नव्हतं".
वर्कफ्रंट
संतोष जुवेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर झेंडा, रेगे, मोरया, रानटी, एक तारा, अस्सं सासर सुरेख बाई, वादळवाट, या गोजिरवाण्या घरात अशा चित्रपट व मालिकांमधून काम करत त्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.