Join us

समीर म्हणतोय, मी लवकरच रंगभूमीवर झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 10:04 IST

       अभिनेता समीर धर्माधिकारीने  हिंदी-मराठी चित्रपट, नाटक मालिकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण ...

 
      अभिनेता समीर धर्माधिकारीने  हिंदी-मराठी चित्रपट, नाटक मालिकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. लवकरच समीर आपल्याला कौल मनाचा या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या या भूमिकेविषयी समीरने लोकमत सीएनएक्सशी साधलेला खास संवाद 
 
 कौल मनाचा या चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे ?
-: खरे सांगु का, या चित्रपटातील माझी भूमिका फार लहान आहे. तसे म्हणायला गेलात तर यामध्ये माझी पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे असे म्हणायलाही काहीच हरकत नाही. पण भूमिका जरी लहान असली तरी ती खुपच छान आहे. मी यामध्ये अमृता पत्कीच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका केलीय. ही भूमिका करताना फारच मजा आली. 
 
 तू ही भूमिका निवडण्यामागचे कारण काय होते ?
-: या चित्रपटाच्या निर्मात्यांना मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून ओळखतो. जेव्हा माझ्याकडे लक्ष्मण दादा आले तेव्हा त्यांनी मला या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगितले. यावेळी एक गोष्ट त्यांनी मला आवर्जून सांगितली  कि या भूमिकेत तू फक्त चेहरा दाखवून जायचे नाही तर त्या भूमिकेला फार महत्व आहे. त्यांनी सांगितल्याप्रामणे माझी भूमिका खरेच खूप महत्त्वाची आहे. हा चित्रपट वेगळ्या संकल्पनेवर आहे आणि यामध्ये मला छोटासा रोल करायला मिळाला ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. 
 तुला बॉलिवूडमध्ये की मराठी चित्रपटांमध्ये काम करताना जास्त कम्फर्टेबल वाटते ?
-: माझ्या दृष्टीने हिंदी-मराठी असा काही फरक नाहीये. मी एका तेलगु चित्रपटामध्येही काम केले आहे. पण मराठी चित्रपटांमध्ये काम करताना खरेच छान वाटते. त्याचे कारण असे की आम्ही मराठी चित्रपटांमध्ये काम करताना टीम मधील बरेच कलाकार एकत्र जेवतो, कधी मस्त गप्पाही मारतो. बऱ्याच दिवसांपासून आम्ही एकमेकांना ओळखत असल्याने इथे काम करताना मजा येते. तर हिंदीमध्ये प्रत्येकाला प्रायव्हसी असते. ती काम करण्याच्या दृष्टीने चांगली देखील असते. तिथे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला येत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी काम करण्याची पद्धती खूप वेगळ्या आहेत. मी मात्र मराठीत जास्त कम्फर्टेबल फील करतो. 
 
 मराठी चित्रपटसृष्टी बदलतेय, मराठी चित्रपट वेगळ्या उंचीवर जात आहेत त्याबद्दल तुझे काय मत आहे?
-: आपण आधीपासूनच चित्रपटांच्यादृष्टीने श्रीमंतच होतो. आता मराठी चित्रपटसृष्टीत योग्य नियोजन होऊ लागल्याने चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग मिळतो आहे. चित्रपटांच्या दर्जेदार कथा असल्याने प्रेक्षक चित्रपट पाहायला येत आहेत. चित्रपट हाऊसफुल्लदेखील होत आहेत. आपला बाज बदलला आहे. आपल्याकडे साहित्याचा खजाना आहे. सध्याचे जे नवीन लेखक येत आहेत त्यांचे काम उल्लेखनीय आहे. मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वेगळे लेखन , साहित्य आणि गोष्ट असते. आपण उत्तम साहित्यकार, नाटककार आणि फिल्ममेकर होतोच, आणि कायम राहणार. 
 
 तू प्रेक्षकांना रंगमंचावर कधी दिसणार आहेस ?
-: मी माझ्या करिअरची सुरुवातच रंगमंचापासून केली आहे. नाटकाला पूर्ण वेळ द्यावा लागतो. सध्या मी जे काम करतोय, जे प्रोजेक्ट्स निवडतोय त्यामधून नाटकासाठी वेळ देणे अवघड होतोय. गेल्या चार-पाच वर्षांपासून माझी नाटकात काम करण्याची खूप इच्छा आहे मात्र काहींना काही अडचणींमुळे ती पूर्ण होत नाही आहे. माझे शेवटचे नाटक नथुराम गोडसे होते. पण लवकरच मी नाटकात काम करीन. मला नेहमीच असे वाटते की नाटकात काम करण्याची नशाच वेगळी असते.