Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 12:57 IST

मदर्स डेच्या निमित्ताने शुभांगी गोखले आणि सखीने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सखीने वडिलांबाबातही भाष्य केलं. 

शुभांगी गोखले आणि सखी गोखले ही मराठी सिनेसृष्टीतील मायलेकीची जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीनेही अभिनयात करिअर करायचं ठरवलं. मदर्स डेच्या निमित्ताने शुभांगी गोखले आणि सखीने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सखीने वडिलांबाबातही भाष्य केलं. 

सखी ही शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेता मोहन गोखले यांची मुलगी आहे. सखी ६ वर्षांची असताना मोहन गोखले यांचं निधन झालं. ते मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता होते. वडिलांची उणीव भासते का? या प्रश्नावर सखीने अगदी थेट आणि मनमोकळेपणाने उत्तर दिलं. ती म्हणाली, "हे ऐकायला कदाचित क्रूर वाटेल. पण, लहान असताना बाबा गेला हे एकार्थी बरं झालं असं मला वाटतं.  तुम्ही मोठे होता तसे त्या त्या वयातील आठवणी जास्त यायला लागतात. माझ्याकडे त्याच्या अशा खूप आठवणी नाहीत. बाबा गेला तेव्हा मी ६ वर्षांची होते. त्यामुळे तुम्ही आईच्या जास्त जवळ आहात की बाबाच्या, हे कळण्याइतपतही माझं वय नव्हतं. तोपर्यंत बाबा खूप काम करत होता. आणि आई कायम माझ्यासोबत असायची. त्यामुळे मला आईचीच सवय होती."

"थोड्या मोठ्या किंवा कळत्या वयात आपल्या आईवडिलांना गमावणाऱ्या लोकांसाठी हे जास्त अवघड आहे, असं मला वाटतं. कारण, इतकी वर्ष तुमचं नातं निर्माण झालेलं असतं. आणि आईवडिलांना गमावणं ही मोठी गोष्ट असते. यासाठी मला वाटतं की मी भाग्यवान आहे. कारण, बाबा अशा वेळेत सोडून गेला जेव्हा मला माहितच नव्हतं की वडील म्हणजे काय...त्यामुळे मला वाटतं की हे चांगलं आहे. बाबा गेल्यानंतर माझे आजोबा बराच वेळ आमच्यासोबत राहत होते. आईचे आणि माझे मित्रमैत्रिणी खूप चांगले आहेत. खूप चांगली माणसं आमच्याशी जोडली गेली आहेत. या सर्व लोकांमुळे मला वडिलांची उणीव कधी भासली नाही. वडिलांची पोकळी जाणवली नाही. कारण, अशी पोकळी असते हे मला माहितच नव्हतं", असंही ती पुढे म्हणाली. 

टॅग्स :सखी गोखलेमराठी अभिनेतासेलिब्रिटी