Join us

Met Gala मध्ये शाहरुखने स्वतःची ओळख करुन दिली, सई ताम्हणकर म्हणते "यात चुकीचं काही नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:56 IST

Met Gala मध्ये शाहरुखला ओळखलं नाही? सई ताम्हणकर म्हणते...

Sai Tamhankar Reaction Shahrukh Met Gala Video: मराठी सिनेसृष्टीतील आघाडींच्या अभिनेत्रींपैकी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) एक आहे. सईने आतापर्यंत अनेक गाजलेल्या सिनेमामधून प्रेक्षकांच्या स्मरणात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. इतकच नव्हे तर तिने बॉलिवूड आणि ओटीटीवरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे सई ताम्हणकर हे सध्या बॉलिवूडमध्येही आघाडीचं नाव झालं आहे.  सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. नुकतेच तिचा 'ग्राउंड झीरो' हा हिंदी आणि 'गुलकंद' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतींमध्ये तिने अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने मत मांडलं. Met Gala 2025 दरम्यान शाहरुख खानसोबत घडलेल्या प्रसंगावरही सईने परखड प्रतिक्रिया दिली आहे.

Met Gala च्या रेड कार्पेटवर आंतरराष्ट्रीय मीडियातील एका रिपोर्टरने शाहरुखला ओळखलं नाही आणि त्याचं नाव विचारलं होतं. यानंतर शाहरुखने शांतपणे, "Hi, I’m Shahrukh" असं म्हणत स्वतःची ओळख करून दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय मीडियाला भारतीयांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. या प्रसंगावर सई ताम्हणकरने म्हटलं, "हे ट्रोलिंग प्रेमापोटी झालंय. शाहरुखला ओळखत नाही का?  हा प्रश्न आपल्याला पडतो,  या आपल्या भावना आहेत. कारण आपलं त्याच्यावर प्रेम आहे. चाहत्यांच्या भावना मी समजू शकते".

तिने पुढे असं म्हटलं, "मी उद्या उठून म्हणू शकत नाही की, मी माझी ओळख तुम्हाला करुन देणार नाही, तुम्ही मला ओळखायलाच हवं, असं नाही ना? प्रत्येकाने त्याला ओळखायलाच हवं, असं काही नाही. सगळं जग तुम्हाला ओळखू शकत नाही. कोणी तरी कुठेतरी असे असेल ज्याला माहीत नसेल की तुम्ही कोण आहात आणि ते ठीक आहे. म्हणूनच, शाहरुखनेही अगदी शांततेनं स्वतःची ओळख करून दिली आणि याच गोष्टीमुळे तो शाहरुख खान आहे".

टॅग्स :सई ताम्हणकरशाहरुख खानमेट गाला