Join us

'असंभव' सिनेमात सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:35 IST

Sachit Patil : सचित पाटीलचा आगामी चित्रपट 'असंभव' हा एक थरारक आणि रहस्यमय सिनेमा असून, या प्रोजेक्टमधून तो पहिल्यांदाच 'तिहेरी भूमिकेत' झळकणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सचित पाटील आता प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त आणि पूर्णपणे नवा अनुभव घेऊन येत आहे. त्याचा आगामी चित्रपट 'असंभव' हा एक थरारक आणि रहस्यमय सिनेमा असून, या प्रोजेक्टमधून तो पहिल्यांदाच 'तिहेरी भूमिकेत' झळकणार आहे. तो अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळत आहे. यापूर्वी त्याने 'साडे माडे तीन' आणि 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन केले होते.

'साडे माडे तीन', 'क्षणभर विश्रांती', 'झेंडा', 'अर्जुन', 'क्लासमेट्स' आणि 'फ्रेंड्स' सारख्या चित्रपटांमधून तसेच 'राधा प्रेम रंगी रंगली' आणि 'अबोली' या मालिकांमधून सचितने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण 'असंभव' मधून तो एका नव्या रूपात आणि एका नव्या आव्हानासह परतला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'असंभव'च्या टीझरने रहस्य आणि थराराची उत्तम झलक दाखवली आहे. सचित पाटीलने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यांना पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शक म्हणून साथ दिली आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, मराठीतील चार दिग्गज आणि नामवंत कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांच्या अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी या चित्रपटाला एक वेगळी उंची देणार आहे. 

'मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट'चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर शर्मिष्ठा राऊत (एरिकॉन टेलिफिल्म्स), तेजस देसाई, मंगेश परुळेकर (पी अँड पी एंटरटेनमेंट) आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांची गुंतागुंत असलेला हा थरारक चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sachit Patil in triple role in 'Asambhav' movie

Web Summary : Sachit Patil's 'Asambhav' is a thriller where he acts, directs, and produces. Alongside Pushkar Shrotri, Patil directs Mukta Barve, Priya Bapat and Sandeep Kulkarni. The movie, produced by Mumbai Pune Films Entertainment, will release on November 21st.
टॅग्स :सचित पाटील