Join us

​सचिन पिळगांवकरांना या कलाकारामध्ये दिसते त्यांचे बालपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 15:56 IST

सचिन पिळगांवकर यांनी एक बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी हा माझा मार्ग एकला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण ...

सचिन पिळगांवकर यांनी एक बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी हा माझा मार्ग एकला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. आज त्यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सत्ते पे सत्ता, नदियाँ के पार, अखियों के झरोको से, बालिका वधू यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका तर चांगल्याच गाजल्या होत्या. ते केवळ एक चांगले अभिनेते नाही तर चांगले दिग्दर्शक, निर्माते, लेखक देखील आहेत. नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवाबनवी यांसारखे उत्कृष्ट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहे. अशी ही आशिकी या चित्रपटावर सध्या ते काम करत असून या चित्रपटात प्रेक्षकांना अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनय हा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे. लक्ष्मीकांत यांनी सचिन यांच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे सचिन आणि लक्ष्मीकांत यांची खूप घट्ट मैत्री होती. त्या दोघांचे घरगुती संबंध देखील खूपच चांगले होते. त्यामुळे अभिनयला लहानाचा मोठा होताना सचिन यांनी पाहिले आहे. आज त्या अभिनयसोबत काम करताना त्यांना खूप आनंद होत आहे. ते अभिनयमध्ये आपले बालपण पाहातात. याविषयी सचिन सांगतात, लक्ष्मीकांत आणि प्रिया यांचे प्रेमप्रकरण, त्यांचे लग्न, अभिनयचा जन्म हे सगळे मी खूप जवळून पाहिले होते. अभिनयला तर मी मांडीवर खेळवले आहे. त्याचा ती सध्या काय करते हा पहिला चित्रपट पाहून मला खूप आनंद झाला होता. अभिनयला पाहाताना मला माझे तरुणपण आठवते. तो खूप चांगला अभिनेता आहे. तो माझ्यासारखाच अतिशय गोंडस आहे. तसेच तो खूपच चांगला डान्सर आहे. अभिनयसोबत काम करावे असे माझ्या डोक्यात कित्येक दिवसांपासून सुरू होते आणि आता अशी ही आशिकी या माझ्या चित्रपटात तो झळकणार आहे. Also Read : सचिन पिळगांवकर सांगतायेत, मी काळाप्रमाणे मला बदलले