सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर यांच्या ‘बापजन्म’ या चित्रपटाची प्रेक्षकांना लागली उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:47 IST
प्रख्यात रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेला आणि सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी लोहोकरे आणि सत्यजित पटवर्धन यांची ...
सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर यांच्या ‘बापजन्म’ या चित्रपटाची प्रेक्षकांना लागली उत्सुकता
प्रख्यात रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेला आणि सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी लोहोकरे आणि सत्यजित पटवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बापजन्म’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'बापजन्म' चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातून प्रख्यात शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची नात आणि आघाडीचा तरुण शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची बहीण दीप्ती माटे ही पार्श्वगायनात पदार्पण करत आहे. हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. बापजन्म चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ असे शब्द असणारे गाणे दीप्ती माटे यांनी गायले आहे. तसेच पुष्कराज चिरपूटकरचा सुद्धा हा पहिला मराठी चित्रपट आहे. ‘कास्टिंग काऊच’ फेम निपुण धर्माधिकारी या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण करत आहे. 'बापजन्म' हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता परदेशातसुद्धा प्रदर्शित होणार आहे. अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविले जाणार आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन्सने केली आहे.या चित्रपटाविषयी बोलताना सचिन खेडेकर सांगतात, “बापजन्म’ हा शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण करत आहे म्हटल्यावर या चित्रपटाबद्दल साहजिकच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाच्या संहितेबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांत संवेदनशीलता ठासून भरली आहे. मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आतापर्यंत आपण पाहिले आहेत. पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदनांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. निपुण हा आजच्या पिढीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याने त्याची सर्जनशीलता खूपच चांगल्या पद्धतीने साकारली आहे.”‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधिकारीनेच लिहिली आहे. तो सांगतो, “सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहानात्मक असायचे.”निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या वेब शोने त्याला घराघरात पोहोचवले. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. निपुणचा २०१५ मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला आहे.Also Read : ठरावीक भागांची मालिका ऑफर झाल्यास मालिकेत नक्कीच काम करेनः सचिन खेडेकर