Join us

रुमानी खरे आणि यशोमन आपटे पहिल्यांदाच झळकणार एकत्र, 'लागली पैज?' नाटक या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:14 IST

Rumani Khare and Yashoman Apte : रुमानी खरे आणि यशोमन आपटे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या उत्तमोत्तम नाटके येत आहेत, या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यात आता 'लागली पैज?' या नव्याकोऱ्या नाटकाची भर पडणार आहे. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या नाटकाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता यशोमन आपटे या नाटकात मुख्य भूमिका साकारत असून अभिनेत्री रुमानी खरे या नाटकातून व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर पदार्पण करत आहे. २१ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

प्रभात थिएटर्सने निर्मिती केलेल्या 'लागली पैज?' या नाटकाचे निर्माते श्रीमती ज्योती कठापूरकर व निखिल करंडे आहेत, तर ज्योती पाटील, प्रियांका बिष्ट, रूपा करोसिया आणि मनोज मोटे हे सहनिर्माते आहेत. नाटकाचे लेखन हर्षद प्रमोद कठापूरकर यांचे असून अंकुर अरुण काकतकर दिग्दर्शित या नाटकात यशोमान आपटे, रुमानी खरे यांच्यासह सुप्रिया विनोद, शंतनू अंबाडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बऱ्याच वर्षांनंतर संदीप खरे यांनी नाटकासाठी गाणी लिहिली असून  त्यांनी लिहिलेल्या गीतांना साई-पियुष यांनी संगीत दिले आहे तर संतोष शिदम हे सूत्रधार आहेत. 

'लागली पैज?' आजच्या तरुणाईच्या नात्याची गोष्ट सांगते.गीतकार संदीप खरे यांची कन्या रुमानीनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र, आता 'लागली पैज?' या नाटकातून रुमानी खरे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. नात्यामध्ये प्रेम आणि महत्वाकांक्षा ह्यांमध्ये जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत यावर या नाटकाचे कथानक आधारीत आहे. आदित्य आणि रेवा या जोडप्यात रेवाला सतत पैज लावण्याची सवय असते. अशावेळी दोघंजण नातं टिकवून ठेवण्याची पैज लावतात, मग त्यांच्या नात्याचं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर नाटक पाहिल्यावरच मिळणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rumani Khare and Yashoman Apte together in 'Lagali Paij?' play.

Web Summary : Yashoman Apte and Rumani Khare star in 'Lagali Paij?', a new Marathi play about love and ambition. The play revolves around a couple, Aditya and Reva, and their relationship challenges. It premieres November 21st at Dinanath Natyagruha.
टॅग्स :यशोमन आपटे