Join us  

"...म्हणून आम्ही लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायचं ठरवलं", रोहित राऊतने सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:34 AM

"लिव्ह इन हा आमच्या आयुष्यातील Best Decision...”, रोहित राऊतचं वक्तव्य चर्चेत

सारेगमप लिटिल चॅम्प्समधून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना लोकप्रियता मिळाली. काही वर्षांपूर्वीच रोहित आणि जुईलीने लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नाआधी काही वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. पण, लग्नकरण्यापूर्वी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. लोकमत फिल्मीला मुलाखतीत रोहित आणि जुईलीने याबाबत भाष्य केलं. 

रोहित आणि जुईलीने लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या खास शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी लिव्ह इनबाबत बोलताना रोहित म्हणाला, "प्रेम, खूप प्रेम आणि आईवडिलांचं प्रेम असे तीन प्रकारचे प्रेम असतात. आम्ही सुरुवातीच्या काळात आईवडिलांचं प्रेम याचा थोडासा फायदा उचलला. आम्ही एकमेकांना विचारलं की आपण लग्न करुया का? त्यानंतर आम्ही दोघांच्याही घरी सांगितलं. घरी आम्ही सांगितलं की आम्ही लग्न करतोय...पण, नंतर ६ महिन्यांनी आम्हालाच प्रश्न पडला की आपल्याला माहितीये का आपण लग्न करणार आहोत का? कारण, आम्ही खूप लांब राहायचो. त्यामुळे आम्हाला भेटायलाही खूप प्रवास करावा लागायचा. त्यामुळे काही दिवसांनी आम्हाला कळलं की हे असं वर्कआऊट होणार नाही. त्यामुळे एकमेकांना जाणून घेण्यासाठी आपल्याला एकमेकांबरोबर राहावं लागणार आहे. कारण, प्रेम कुठल्याही व्यक्तीवर असू शकतं. पण, कुठल्याही व्यक्तीबरोबर तुम्ही राहू शकत नाही". 

"यासाठी आम्ही सुरुवातीला मग आईवडिलांच्या विश्वासाचा थोडा फायदा उचलला. मी सांगितलं की कल्याणवरुन ज्युईलीला झेव्हियर्सला भेटायला येण्यासाठी ओला टॅक्सीला खूप पैसे जातात. हिला एकटीला राहण्यासाठी भाडं खूप द्यावं लागेल. त्यामुळे आम्ही मग त्यांना असं सांगितलं की आम्ही दोघं मिळून एक खोली भाड्याने घेतो. हवं तर 2BHK घेतो. तुम्हीही कधीही येऊ शकतो. आमच्या दोघांचेही बाबा खूप कडक शिस्तीचे असल्यामुळे आमच्या आईंनी त्यांची समजूत घातली. माझी आई इथे आली आणि आमच्याबरोबर राहतेय असा कॉन्ट्रॅक्ट तिने साइन केला. आमचं लिव्ह इन रिलेशनशिपसुद्धा आईवडिलांनी मॉनिटर केलेलं होतं. लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केल्यानंतर लॉकडाऊन लागलं. त्यामुळे आम्हाला बाहेरच पडता आलं नाही. त्यामुळे १ वर्ष आम्हाला एकमेकांना जाणून घ्यायला मिळालं. लिव्ह इन रिलेशनशिप हा आमच्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता आणि तो मजेसाठी घेतलेला नव्हता. रिलेशनशिप ही सिरियस गोष्ट आहे," असंही त्याने पुढे सांगितलं. 

रोहित राऊत आता प्रोफेशनल प्ले बॅक सिंगर आहे. मराठी, हिंदी सिनेमांसाठी तो गाणी गातो तसंच कंपोजही करतो. तर जुईलीही प्रसिद्ध गायिका आहे. दोघांची लाईव्ह कॉन्सर्ट्सही होतात. 2022 मध्ये हे क्युट कपल लग्नबंधनात अडकलं.

टॅग्स :रोहित राऊतलग्नटिव्ही कलाकाररिलेशनशिपसंगीत