Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिचा अग्निहोत्रीची कन्नडा ‘किक’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 16:16 IST

कलर्स मराठी चॅनलवरच्या ‘ढोलकीच्या तालावर’ या लावणीवर आधारित रिअॅलिटी शोमधूम आपल्या नृत्य कौशल्याची छाप उमटवून अवघ्या महाराष्ट्रात पोहचलेली रिचा ...

कलर्स मराठी चॅनलवरच्या ‘ढोलकीच्या तालावर’ या लावणीवर आधारित रिअॅलिटी शोमधूम आपल्या नृत्य कौशल्याची छाप उमटवून अवघ्या महाराष्ट्रात पोहचलेली रिचा अग्निहोत्री आता दक्षिणेत चालली आहे. या कार्यक्रमातील तिच्या बहारदार परफॉर्मन्समुळे प्रभावित होऊन ‘उदया’ या कन्नडा चॅनलनं तिला ‘किक’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्यामुळे मराठमोळी रिचा आता कन्नडा चॅनलवरून आपलं नृत्य कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. के. जे. सोमय्या कॉलेजमध्ये शिकत असलेली रिचा मुळची ठाण्याची आहे. आई वैष्णवी अग्निहोत्री यांच्याकडून कथ्थक आणि गाण्याचे प्राथमिक धडे तिने गिरवले. सध्या डॉ. मंजिरी देव यांच्याकडे कथ्थक पुढचं शिक्षण घेत ती विशारद करते आहे. यापूर्वी तिनं ‘मिस ठाणे’ हा किताबही पटकावला आहे. तसंच ‘अमूल’च्या जाहिरातीतही ती चमकली होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोरही तिनं नृत्य सादर केलं होतं. कलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’च्या आधीच्या पर्वातही तिचा सहभाग होता. तिचं नृत्य कौशल्य पाहून ढोलकीच्या तालावरच्या नुकत्याच झालेल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची संधी तिला मिळाली आणि त्याचं सोनं करत तिनं टॉप फाइव्हपर्यंत मजल मारली. तिने सादर केलेल्या एकाहून एक सरस अशा परफॉर्मन्समुळे परीक्षकांनी ही तिचे भरभरून कौतुकही केलं. ‘ढोलकीच्या तालावर’मधील तिचं सादरीकरण पाहून कन्नडा चॅनल ‘उदया’नं सेलिब्रेटी डान्सर म्हणून “किक” या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आहे. १६ जुलैपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. दिवंगत कन्नडा सुपरस्टार राजकुमार यांचे चिरंजीव शिव राजकुमार या कार्यक्रमात मुख्य परीक्षक असतील. तसंच कन्नडा टीव्ही मालिका आणि चित्रपटांतील सेलिब्रेटी कलाकारांचाही त्यात समावेश आहे. ”ढोलकीच्या तालावर’मध्ये खूप शिकायला मिळालं. वेगवेगळ्या नृत्यशैली शिकता आल्या, अनेक प्रयोग करून पाहता आले. माझ्यासाठी तो खूप मोठा आणि अविस्मरणीय असा अनुभव होता. आता कन्नडा रिअॅलिटी शोमध्ये जाण्याची संधी मिळाल्यानं अधिक आनंद झाला आहे. या निमित्तानं अजून नवीन शिकता येईल. कन्नडा भाषा समजून घेता येईल,’ अशी भावना रिचाने व्यक्त केली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना आदर्श मानून रिचा तिची पुढील वाटचाल करत आहे. नृत्यासह अभिनयातही तिला रस असून मालिका आणि चित्रपटांसाठी तिला विचारणा होत आहे. मात्र त्यापूर्वीच तिचा ‘किक’ या रिअॅलिटी शोमधून एक नवीन प्रवास सुरू होत आहे.