Join us

ऋषभ आणि पूजा ही नवी जोडी झळकणार 'अॅट्रॉसिटी’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 16:43 IST

रुपेरी पडद्यावर आजवर बऱ्याच जोड्या लोकप्रिय झाल्यात. यातील सर्व जोड्या कधी ना कधी प्रथमच एकत्र आल्या होत्या.त्यातील अनेकांनी ऑंनस्क्रीन केमेस्ट्री ...

रुपेरी पडद्यावर आजवर बऱ्याच जोड्या लोकप्रिय झाल्यात. यातील सर्व जोड्या कधी ना कधी प्रथमच एकत्र आल्या होत्या.त्यातील अनेकांनी ऑंनस्क्रीन केमेस्ट्री बळावर रसिकांना मोहिनी घातली आहे. आर.पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी चित्रपटातील ऋषभ व पूजाची नवी जोडी रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. २३ फेब्रुवारीला ‘अॅट्रॉसिटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवीन असल्यामुळे सुरुवातीला काम करताना अवघडल्यासारखं वाटलं, पण दिग्दर्शक दिपक कदम यांनी आम्हाला समजून घेतल्यामुळे काम करताना मजा आली. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून आमची केमेस्ट्री प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.‘अॅट्रॉसिटी’ या कायद्याबाबत समाजात विशेष जागृती नाही ही जागृती व्हावी या उद्देशाने डॉ. राजेंद्र पडोळ  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन दिपक कदम यांचे आहे. या दोघांसोबत या चित्रपटात यतिन कार्येकर, विजय कदम, गणेश यादव, लेखा राणे, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, निखिल चव्हाण, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संकल्पना डॉ. राजेंद्र पडोळे यांची असून राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. छायांकन राजेश सोमनाथ तर संकलन विनोद चौरसियायांचे आहे. संगीत अमर रामलक्ष्मण यांचे आहे.  ‘अॅट्रॉसिटी’मध्ये निखिलने मनीष चौधरी नावाची व्यक्तिरेखा साकारली असून, हा चित्रपटाचा खलनायक आहे. ‘अॅट्रॉसिटी’सारख्या महत्त्वाच्या विषयावर आधारित असलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याने निर्माता आणि दिग्दर्शकाचे आभार मानत निखिल म्हणाला की, सर्वच कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची इच्छा असते, पण पदार्पणातच खलनायकासारखी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्याचं नवं रूप सादर करता आल्याचा खूप आनंद आहे.