Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्ची’च्या चाहत्यांसाठी खूशखबर, रिंकू म्हणते सध्या लग्न नाही तर ही गोष्ट महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 14:34 IST

सैराट सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली.

'सैराट' सिनेमातून साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारी आर्ची. महाराष्ट्राच काय तर सारा देश आर्चीच्या प्रेमात पडला. तरुणाईला अक्षरक्ष: आर्चीचे वेड लागलंय. ही आर्ची म्हणजेच महाराष्ट्राची लाडकी मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु. सैराट सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. काही दिवसांपूर्वी रसिकांची हीच लाडकी 'आर्ची' ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरली होती. निमित्त होतं ते म्हणजे तिचे फोटो. हे फोटो होते चक्क वधूरुपातील. हा नववधू रुपातील अंदाज पाहून रिंकू लग्न करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र स्वतः रिंकूनं या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 

 

लग्नाच्या बातम्या वाचून हसू आल्याचे रिंकूनं सांगितले आहे. सध्या तरी लग्नाचा विचारही मनात नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. आपलं सगळं लक्ष सध्या पूर्णपणे शिक्षण पूर्ण करणे आणि करिअरवर केंद्रीत केलं असल्याचे सांगायलाही ती विसरली नाही. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेत रिंकू उत्तीर्ण झाली. अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यामागचं रहस्यही तिने यावेळी सांगितलं. परीक्षेच्या काळात कोणताही चित्रपट करत नसल्याने अभ्यासावर पूर्णपणे लक्ष देता आल्याचे तिने सांगितले. मात्र लग्नाबाबतच्या तिच्या या खुलाशामुळे आर्चीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणांचा जीव भांड्यात पडेल, नाही का? 

टॅग्स :रिंकू राजगुरू