Join us

​अंकुश चौधरीसोबत झळकणार रिधिमा पंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 17:44 IST

बहू हमारी रजनी_कांत या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या मालिकेत रजनी ही प्रमुख भूमिका रिधिमाने साकारली होती. ...

बहू हमारी रजनी_कांत या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या मालिकेत रजनी ही प्रमुख भूमिका रिधिमाने साकारली होती. या मालिकेत एका यंत्रमानवाच्या रूपात रिधिमाला पाहायला मिळाले होते. या मालिकेने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी मालिकेत यश मिळाल्यानंतर आता रिधिमा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळत आहे. ती आता एका मराठी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारत आहे. रिधिमाला बहू हमारी रजनी_कांत ही मालिका करण्याच्याआधीपासूनच मराठीत काम करण्याची इच्छा होती आणि त्यात तिला चांगली भूमिका ऑफर झाल्याने तिने मराठी चित्रपटासाठी लगेचच होकार दिला. या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत ती झळकणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी रिधिमा खूप उत्सुक असल्याचे कळतेय. रिधिमाने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे. या चित्रपटात ती गावात राहाणाऱ्या एका साध्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेसाठी तिचा लूक खूप वेगळा असणार आहे. रिधिमा बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत आपल्याला अतिशय मॉर्डन रूपात दिसली होती. पण आता प्रेक्षकांना ती तिच्या मराठी चित्रपटात अतिशय साध्या रंगभूषेत आणि वेशभूषेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी तिने केसांना डायदेखील केला आहे. तिने या भूमिकेसाठी केस काळेभोर केले असून या चित्रपटात अतिशय कमी मेकअपमध्ये प्रेक्षकांना तिला पाहायला मिळणार आहे. रिधिमाचे वडील हे मराठी असून तिची आई गुजराती आहे. सध्या ती मराठी चित्रपटात काम करत असल्याने तिचे नातलग खूपच खूश आहेत. या चित्रपटासाठी ती कोंकणी भाषा बोलायला शिकत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत आहेत.